विठ्ठला कॉलिंग - Cycling Wari to Pandharpur with Indo-Athletic Society
- इंडो अॅथलेटिक्स सोसायटी ( आय.ए.एस.) ची पुणे-
पंढरपूर सायकल वारी ७ जून २०२५
कानडा हो विठ्ठलू कर्नाटकू| येणे मज लावियेला वेधू || अशी त्या सावळ्या
विठ्ठलाच्या मूर्तीची मोहिनी ज्ञात इतिहासात गेली हजार-बाराशे वर्षे समाजातल्या
संवेदनशील मनांना घातलेली दिसते. त्याविषयीचे कुतूहल शमविण्याच्या प्रयत्नातील एका
पावलाची ही कथा, माझी माझ्यासाठी....
वर्ष २०२५ चा उन्हाळा थोडा लवकरच सुरु झाला. मार्च च्या दुसर्या आठवड्यातल्या
एका व्यस्त दिवशी घरी परतल्यावर सहाव्या प्रहरात जेवून फोन हातात घेतला तेव्हा
दिवसभर त्याचा घडलेला विरह असह्य झालेला होता. सह्याद्री सायकलिंग च्या ग्रुपवर
सुमारे अर्धशतकी मेसेजेस मधून इंडो अॅथलेटिक्स सोसायटी ने आयोजित केलेल्या पंढरपूर
वारी ची चर्चा सुरु असलेली दिसली. नेहमीच्या सायकलिंग बडीजना न विचारता एकदमच थेट
त्यांच्या या उपक्रमात नाव दाखल केले आणि खऱ्या अर्थाने आपली नाव त्या प्रवाहात
ढकलून दिली. आणि मग आपलेच आपल्या या उत्स्फूर्त कृतीचे कुतूहल वाटून बरोबर कोणी
येतंय का याचा शोध सुरु केला. कदाचित मागील वर्षी झालेल्या अपघातानंतर खंडित
झालेले दीर्घ अंतराचे सायकलिंग सुरु करण्याची सुप्त इच्छा, कदाचित आपली क्षमता तपासण्याची किंवा सिद्ध करण्याची
पुन:श्च प्रबळ झालेली आकांक्षा असेलही. परंतु त्याही पेक्षा ही ओढ काहीतरी वेगळी
आहे असे मन मात्र सांगत होते.
उन्हाळ्याचे दिवस सुरु झालेले, सकाळी ९ नंतर तापणारे सूर्य देव, मार्चच्या
महिन्यातला दक्षिण भारत दौरा आणि कामाची गडबड यामुळे लांबच्या अंतराचा सायकल सराव
झाला नाही. एप्रिल मध्ये एक दोन १०० किमी च्या राईड झाल्यावर सायकल ला संजय
सातपुतेंचा आशीर्वाद घेतला आणि त्यांच्या हाती अगदी मक्खन झालेली सायकल भर पावसातच
घरी घेऊन आलो. मग अवेळी आलेला पाउस पथ्यावर पडला आणि सराव लांबला. आय.ए.एस. चे
प्रोत्साहनपर आणि माहितीपूर्ण मेसेज ग्रुपवर येऊ लागले होतेच. मे च्या पहिल्या
आठवड्यात कामशेत ची परत फेरी करून येताना आय.ए.एस. च्या ऑफिस मध्ये आपल्या शरीराचे
माप आणि आय.ए.एस. ने नियोजित केलेल्या शिंप्याचे माप जुळते आहे ना पाहायला गेलो.
तिथे आय.ए.एस. च्या वारीचे नियोजन करणाऱ्यांची चेहरे ओळख झाली.
मग पुन्हा दोन आठवडे पावसाने झोड उठवली. आता पाउस असो वा नसो, वारीच्या
आधीच्या रविवारी पुन्हा कामशेत पर्यंत जाऊन येताना आय.ए.एस. च्या ऑफिसमधून जर्सी,
बिब आणि टी-शर्ट घेऊन यायचं ठरले. या राईड ला जाताना तळेगावलाच पावसाने गाठले आणि
आपल्या सायकल ला बसवलेले मड-गार्ड बर्याच अंशी शोभेचे आहेत हे पक्के मनात ठसले.
वडगावच्या “पातळ सांबार” हॉटेलमध्ये चविष्ठ मिसळ खाऊन परत निघालो आणि सायकल पंक्चर
झाली. माझ्या सायकलिंगच्या १३ वर्षातील अनुभवातले तिसरे पंक्चर. टायर मध्ये रुतून
लपलेली छोटीशी बर न दिसल्यामुळे, टाकलेली नवीन ट्यूब रावेत जवळ हायवे सोडून आत
शिरताना पुन्हा पंक्चर झाली. सुनील आणि तेजस हे दोन तगडे मित्र बरोबर असल्यामुळे
एकाच फेरीत दोनदा या आवश्यक शिकवणीचा सराव झाला.
आय.ए.एस.च्या ऑफिस मध्ये गेल्यावर सुमारे २००० ते २३०० लोकांनी या राईड साठी
नोंदणी केली असल्याचे कळले आणि पंढरपूरहून परतीचा प्रवास पांडुरंगाच्या कृपेवर न
सोडता आपणच काहीतरी नक्की ठरवावे असे ठरले.
रविवारच्या राईड मध्ये भिजल्यामुळेच कि काय मंगळवारी घसा धरला. पाठोपाठ
सर्दीने नासिकेवर आपला कब्जा केला. खबरदारीचा उपाय म्हणून गुरुवारची सिंहगड चढाई
टाळली तरी पंढरपूर सायकल वारीसाठी तब्येत काही साथ देईल असे वाटेना. शुक्रवारी अश्या
दोलायमान स्थितीत काम उरकले आणि संध्याकाळी राईड कप्तान श्रीकांत ला फोन केला.
उद्या सकाळी झोप झाल्यावर कसे वाटते त्यावर निर्णय घ्या असे सांगून त्याने अंतिम
निर्णय माझ्यावरच सोपवला. मनोमन पांडुरंगाचा धावा करून दिवस संपवला आणि लवकर
निद्रिस्त झालो.
आय.ए.एस. च्या वेब साईट वर आधीच्या सायकल सफरींचा स्त्रावा वर नोंदलेला इतिहास
पाहून २०० किमी पेक्षा जास्तीच्या राईड साठी तयारी “मध्यम” असल्याचा निर्वाळा
त्यांनी दिलेला होता. हा शेरा खोडून काढायची संधी विविध कारणांनी मिळाली नव्हती
आणि आता प्रत्यक्ष निघण्याचा दिवस येऊन ठेपला होता.
२०० किमी पेक्षा जास्तीचा पहिलाच सायकल प्रवास, त्यात पूर्ण बरी नसलेली तब्येत, पावसाची शक्यता या विचारांमुळे कितीही प्रयत्न केला तरी मनाची
चंचलता काही कमी होईना. उण्यापुऱ्या तीन-साडे तीन तासांनीच जाग आली. मग पुढचे दोन
तास विविध उपायांनी निद्रा देवतेची आराधना करण्यात घालवला. आणि पहाटे ३ चा गजर
झाला. उठल्यावर पंढरपूरच्या विचाराने मनावरचे मळभ दूर झाले आणि तजेलदार मन:स्थितीत
आवरले. सायकल रथावर सर्व आयुधे आधीच लावून सज्ज केलेली होती. सफरीसाठी आवश्यक
जामानिमा आणि शिरस्त्राण घालून तयार झाल्यावर चंदनाचा निरोप घेतला आणि प्रस्थान
ठेवले.
वडगावच्या विठ्ठल मंदिराचे कळस दर्शन घेऊन ४ वाजता पुढे निघायचे असे ठरले
होते. तेजस, त्याची पत्नी सुजाता आणि
मी असे तिघे पोचलो तेव्हा सुनिल तिथे वाट पाहत होता. योगेश, श्रीकांत आणि आशिष असे तिघे आल्यावर विठ्ठलाच्या पायी
नमस्कार वाहून निघालो. सारसबागेपाशी महेंद्र, अश्विन आणि वैभवचा निरोप घेऊन पुढे निघालो तेव्हा पंढरपूर वारी साठी निघालेले
आणखीन बरेच सायकल वीर भेटले.
सेव्हन लव्हज चौकात समोर उंचावर तेजस्वी शुक्राचे दर्शन झाले. इतर तारकांनी
मात्र ढगांच्या झिरझिरीत पडद्याआड राहणेच पसंत केले. शुक्राची चांदणी हि रमणीय
असली तरी आज उन्हाने काहिली होणार बहुतेक असा विचार माझ्या मनात त्या क्षणी येऊन
गेला.
हडपसर चे नोबेल हॉस्पिटल हा वारीचा दुसरा फ्लॅग ऑफ पॉईंट होता. तिथे
पोचेपर्यंत निगडीहून आलेले वीर पुढे गेले होते. त्यामुळे थांबण्याचा प्रश्न
नव्हता. पहाटेच्या वर्दळीतून सायकल पुढे दामटली. सोलापूर रस्ता चांगला विस्ताराचा
असल्यामुळे पहाटेच्या रहदारीचा डावीकडून शिस्तीत जाणार्या सायकल स्वारांना विशेष
त्रास नव्हता. रस्ता बराचसा समतल असल्यामुळे चांगल्या वेगाने अंतर कापायला सुरुवात
झालेली होती.
थेऊर फाट्याला फक्कड गुळाचा चहा वाट पाहत होता. महेंद्र आणि
अश्विन आमचा निरोप घेऊन इथून पुण्याला परतणार होते. तिथे पोहोचेपर्यंत वाटेत
बर्याच सायकल स्वारांना मागे टाकून पुढे जाताना आपल्याला मिळालेला “मध्यम” तयारीचा
शिक्का आज नक्कीच पुसला जाईल असा विश्वास मनात डोकावून गेला.
जावजीबुवाच्या वाडी पाशी ६.०० वाजता पोहोचलो. तिथल्या रिलायंस
च्या पेट्रोल पंपाजवळ पहिला थांबा होता. आय.ए.एस. च्या उत्साही स्वयंसेवकांनी
आवर्जून थांबवले, उत्तम चवीचा नाश्ता, आणि
उत्तम चहा कॉफी चा आस्वाद घेऊन पुढे निघालो. आता उजाडले होते. आणि रस्ता समोर सरळ
दूरवर गेलेला दिसत होता. “पावसाच्या पाण्यात तत्काळ विरघळणारी गोष्ट म्हणजे
महापालिकेचे डांबर” या विनोदाची आठवण व्हावी अशी खडीची चून रस्त्याच्या
पृष्ठभागाशी असलेले नाते तोडून विखरून डावीकडे गोळा झालेली दिसत होती. तरीही
रस्त्यावर खड्डे पडलेले नसल्यामुळे सायकलीचा वेग कमी करावा लागत नव्हता.
महामार्गा ला लागून असलेले उद्योग आणि उत्पन्नाची साधने यांच्यातला एक बदल
लक्षात येणारा असतो. विशेषेकरून सायकल सारखे कमी गतीने जाणारे वाहन असताना त्याचे
निरीक्षण करता येते. शहराच्या सीमेवर असलेली वाढत्या वस्तीच्या गरजा पुरविणारी
फर्निचर, मार्बल सारख्या वस्तूंची
दुकाने, त्यापुढे हौसेच्या जास्त जागा लागणाऱ्या वस्तूंची दुकाने व नर्सरी, त्यापुढे विकसकांनी घेऊन ठेवलेल्या आणि काम्पौंड चे पांढरे
खांब उभारलेल्या पडीक जमिनी. रस्त्याकडेने टाकलेला कचरा, त्यातील प्लास्टिकच्या पिशव्या वाऱ्यामुळे उधळून पडीक
जमिनीत वाढलेल्या काटेरी झुडूपांवर ओंगळवाण्या अडकलेल्या आणि मग त्यापुढे शेती. मे
महिन्यात सुरु झालेल्या पावसाने शेतीचे बांध सुद्धा हिरवाईने नटले असल्यामुळे दोन
शेतांमधील सीमारेषा पुसल्या सारख्या दिसत होत्या.
केडगाव फाटाच्या अलीकडेच ढगांच्या पातळ पडद्याआड नारिंगी सूर्यबिम्बाचे दर्शन
झाले. पूर्वेकडे क्षितिजाजवळ मात्र कुरकुंभ जवळच्या टेकड्या सावळ्या रंगात धूसर
दिसत होत्या. माफक चढ-उताराचा नाकासमोर सरळ गेलेला सावळाच डांबरी रस्ता आम्हाला
त्याच सावळ्या रंगाकडे घेऊन जाणार होता. तो सावळा रंग बरसणाऱ्या कृष्ण मेघांचा, तसाच विठ्ठलाच्या मूर्तीचा.
कुरकुंभच्या आधीच्या चढावर पावसाच्या टपोऱ्या
थेंबांनी स्वागत केले. त्यापासून बचावाची कोणतीही साधने जवळ बाळगलेली नव्हतीच
त्यामुळे जलधारांमध्ये न्हाऊन निघणे हे क्रमप्राप्तच होते. पाउस पुढे असो अथवा नसो
आता भिजलेल्या स्थितीतच पुढे नऊ – दहा तास सायकल चालवायची आहे या विचाराने मनाची तयारी
केली. तो सावळा विठुराया घेईल काळजी असे कितीही बजावले तरी शंकित मन स्वस्थ बसत
नव्हते.
कुरकुंभच्या मुख्य चौकातल्या उड्डाणपुलावर मागचे चाक बसले तेव्हा जवळपास ७५-७८
किमी सायकल मारून झालेली होती. दगडाची बारीक कपची, खडा किंवा फुटलेली काच, कधी लोखंडी
तारेचा एखादा तुकडा त्यांच्या त्यांच्या करवती टोकदार गुण धर्माला जागतोच. “आलिया
भोगासी असावे सादर” म्हणत ट्यूब बदलण्याचा
उपक्रम सुरु केला. मागून आलेल्या आशिष ची चांगली मदत झाली. रस्त्यावर साठलेल्या
पावसाळी पाण्याच्या डबक्यातून मोठ्या वाहनांच्या चाकांनी उडणाऱ्या पाण्याने मधून
मृत्तिका स्नान व्हावयाचे तर वरून पडणारा पाऊस ते धुवून काढायला तत्पर होत असे. पंक्चर
काढून पुढे निघालो. १०-१५ मिनिटावर पुढचा थांबा होता. तिथे गरम पोहे आणि चहा अशी
उत्तम व्यवस्था होती. तिथे पोहोचतो तर सुजाता च्या सायकल चे मागचे चाक पंक्चर झाले
असल्याचे कळले. त्याची दुरुस्ती आणि भिजल्या स्थितीत गरम गरम नाश्ता, चहा घेताना पाऊण तास कसा गेला कळले नाही.
तुलनेने रखरखीत असलेल्या या प्रदेशात जाताना पाउस मिळणे म्हणजे तुम्ही नशीबवान
आहात असे हि वारी पूर्वी केलेल्या मित्रांचे म्हणणे होते आणि आम्ही त्यांच्या
म्हणण्यांनुसार भाग्यवान ठरलो होतो. पांडुरंगाची कृपाच म्हणायची. सुदैवाने आता
पाउस थांबला आणि आभाळही चांगले निवळू लागले होते.
भिगवणची पांढरी चढून गेल्यावर जोगेश्वरी मिसळ पाशीचा थांबा
गाठला तेव्हा १०.३० वाजून गेले होते. या प्रदेशातील पांढरीची टेकाडे म्हणजे कमी
चढाची मुरुमाड ढेकळेच जणू. बेरड जमीन आणि कमी पावसाचा प्रदेश, त्यामुळे त्यावर
बोरी-बाभळीचे साम्राज्य. पावसामुले भुईवर डोकावणारे हिरवे कोंब आणि मधूनच
डोकावणारी करड्या रंगाची एखादी शिळा किंवा दगडाचा पट्टा.
उन्हाचा ताप थेट जाणवत नसला तरी उष्म्याला चांगली सुरुवात झालेली होती. भिगवण
ते पळसदेव च्या टप्प्यात डावीकडे उजनी च्या जलाशयाचे बराच वेळ दर्शन होत होते.
आभाळात पसरलेल्या ढगांच्या आता गुठळ्या होऊ लागल्या होत्या आणि त्यामधून सूर्य
लपंडाव खेळू लागला होता. असह्य उकाडा जाणवू लागे आणि मग लगेच त्यातल्या त्यात
ढगाचा जाडसा पदर सूर्याला झाकून टाकत असे, थोड्या वेळासाठी का असेना. तीही हरीची
कृपा, तसेही तो कनवाळू आहे असाच अभिप्राय संत वान्ग्मायात वाचायला मिळतोच कि!
पळसदेव जवळ येता येता डावीकडे जलाशयात एक शिखर दिसू लागले.
पुरातन पळसदेवाच्या मंदिराचे ते शिखर असावे असे वाटले, शंका विचारायला बरोबर कोणीच
नव्हते. फक्त मी, माझी पुढे जाणारी सायकल, लयबद्ध खाली वर होणारे पाय, त्याच लयीत
चालणारा श्वास आणि गतीशी गुणोत्तर साधून येणारा चाकांचा चक-चक-चक आवाज, उजवीकडून
भुर्रकन जाणारी वाहने आणि मागे पुढे अंतर राखून येणारे इतर सायकलस्वार, मधूनच
जलाशयावरून उडत येणारे किंवा जाणारे बगळे किंवा करकोचे इतकेच.
वारीला जायचे ठरविल्यावर मुद्दामहून वाचलेले, ऐकलेले अभंग, नित्यपाठ आणि
हरीघोष कानात रुंजी घालू लागले. त्यांचा ताल आणि प्रवासाची लय अचानक जुळून आली.
त्याचबरोबर त्यातील शब्द मनावर हळू हळू अर्थ उमटवू लागले. कुठे वाचलेल्या या
शब्दार्थांचा बोध होऊ लागला तशी बोधाच्या पलीकडले जाणण्याची आपली क्षमता अजून नाही
हेही जाणवू लागले.
पळसदेव च्या थांब्यावर पोचलो तेव्हा १२ वाजत आले होते. थंडगार
निम्बूझ आणि रसदार संत्री असा खुराक घेऊन थोडा दम श्वास हलका केला आणि पुढे
निघालो. शून्य सावलीच्या दिवसापासून आजचा दिवस दूर असला तरी मान खाली घालून सायकल
चालवताना थेट खाली पडलेली सावली दोन गोष्टींची निदर्शक होती. एक म्हणजे सूर्य थेट
माथ्यावर आलेला होता आणि ढगांचे आच्छादन पूर्णपणे मागे सरले असल्याचे. इथून
जेवायचे ठिकाण अजून एक तासाने येणार. म्हणजेच तोवर कडक उन्हात पेडल मारायचे. सकाळीच
पावसाने कपडे भिजलेले. ते वाळले आहेत असे वाटावे तोवर पुन्हा घामाने भिजले असल्याची
जाणीव होऊ लागली.
उन्हाची तमा कशाला बाळगायची. आपलीच पडलेली हलणारी छाया पाहताना विचार आला. जी
छाया या प्रखर प्रकाशामुळे संभवते, ती ज्याची छाया, तो देह सुद्धा या प्रकाशाच्या
स्त्रोतामुळेच संभवतो ना! दमल्या भागल्या जीवाला, बरसणारी शीतल पर्जन्य वृष्टी जर
त्याचे रूप वाटते तर आता हा प्रखर सूर्य प्रकाश त्याचेच रूप नाही का? हा विचार
चमकला मात्र, उन्हाचा आधी असह्य होणारा ताप एकदम सुसह्य झाला. कोणी म्हणावे हे
मनाचे खेळ तर कोणी काही. पण अश्या अनुभवातून गेल्यावरच ते सुचतात आणि खरे सांगायचे
तर भावतात हे मात्र खरे.
एका बाजूस पूर्वी वाचलेल्या आणि अत्यल्प स्मरण शक्तीने साठवलेल्या अभंगाच्या
ओळी, बहुधा धृपदेच, चाली सहित ओठावर येत होत्या, तर दुसर्या बाजूस ते अभंग पूर्ण आठवत नसल्याची आणि ती साहित्यकृती कोणी
कोणासाठी लिहीली ते आठवत नसल्याची खंत, कोणता अभंग किंवा कवन रामाचे, कोणते श्रीकृष्णाचे, कोणते गणपतीचे, काही शिवाचे . आपण तर पंढरीला निघालो आहोत जिचा स्वामी
पांडुरंग. पण आठवत नाही म्हणून मनात येतील ती कवने गुणगुणतो आहोत असे वाटून मनाचा
गोंधळ उडू लागला. इतक्यात गदिमांचे “ बाई मी विकत घेतला शाम” आठवले त्यातील “ हाच
तुक्याचा विठ्ठल आणिक दासाचा श्रीराम” ही ओळ आठवली आणि मनीचा गोंधळ तत्काळ शमला.
इंदापूर जवळ येत होते. पाय लयीत आणि वेगाने हलत होते.
इंदापूर बायपासच्या फाट्यावर पाणी भरून देण्यासाठी स्वयंसेवक सज्ज होते. ‘ इथून
जेवायचे ठिकाण आता जवळच आहे, इंदापूर डावीकडे ठेवून जायचे आणि गाव संपले कि
लगेच....’ आशिष ने माहिती दिली.
हुरूप आला. पोटात कावळे कोकलत होतेच. दोघांनी वेगाने प्रस्थान ठेवले. इंदापूरची
वस्ती डावीकडे दूरवर दिसत होती. गावाचा विस्तार संपायला सुमारे अर्धा तास लागला
आणि आम्ही एकदाचे अथर्व कार्यालयाच्या आवारात दाखल झालो.
मोठे कार्यालय, हात, तोंड धुवायला चांगली व्यवस्था. प्रशस्त डायनिंग हॉल मध्ये
हारीने मांडलेल्या जेवणावळी च्या पंगती. आय. ए. एस चे उत्साही स्वयंसेवक नियोजन
करणारे, स्वत: पदार्थ वाढणारे.
भरगच्च जेवणाचा बेत अगदी तृप्तीचा ढेकर येईपर्यंत. जिलेबीचे जेवण जेवून बाहेरच्या
हॉल मध्ये आलो. विश्रांतीसाठी चक्क गाद्या घातलेल्या होत्या. आधी पोचलेले काही
सायकलस्वार तिथे आवश्यक ताणाचे व्यायाम घेत होते तर काही निवांत विश्रांती.
स्टॅटिस्टक्स च्या भाषेत सांगायचे तर एकूण सायकल स्वारांच्या संख्येत आम्ही +/-१
सिग्मा मधले असल्यामुळे आम्ही पोहोचू तेव्हाच गर्दी असे. त्यामुळे गादीचे सुख
नशिबात नव्हते. मग फरशीवरच लवंडलो. खायला कोंडा(त्या सुग्रास जेवणाला कोंडा म्हणू
नये, पण म्हणी साठी) आणि
निजायला धोंडा असे झाले. थोडा वेळ मस्त डोळा लागला. पावणे दोन वाजता जागृतावस्थेत
येऊन पुढे निघायची तयारी केली आणि निघालो.
इथून टेम्भूर्णी एक तासावर, थोडा कललेला सूर्यदेव, तरीही प्रखर. डावीकडे दिसणारे उजनी
धरण ओलांडले आणि पुढे शिवसेना शाखेतर्फे आयोजित थांब्यावर थंडगार ताकाचा आस्वाद
घेतला. प्रेशर वॉशिंग चे मशीन लावून उडणार्या तुषारांनी अंघोळ घालण्याची त्यांनी
केलेली सोय सुखावून गेली. बुडाखाली असलेल्या सीट वर ज्वालामुखी पेटला होता त्याचे
मात्र काही करता येणे शक्य नव्हते.
टेम्भूर्णी सुमारे तीन वाजता आले आणि उजवीकडेचा पंढरपूर
फाटा पकडला. आता राज्य रस्ता महामार्ग, दुपदरी, उंच
सखल, खडबडीत पृष्ठभागाचा. हाच रस्ता खाली हैदराबाद कडे जातो त्यामुळे ट्रक्स ची
वर्दळ असलेला. फाट्यावर उसाच्या रसवंती गृहाचा सिग्नेचर खुळ्ळ खुळ्ळ आवाज ऐकला
मात्र सायकल चे ब्रेक आपोआप लागले. तेजस आणि सुजाता येई पर्यंत रसाचे पेले घेऊन
खुर्चीवर विसावलो. आधुनिक बांधणीचे उसाचे चरक इथेसुद्धा पोचलेले दिसले. पूर्वी या
आवाजासाठी चरक चालू ठेवायला लागत, मग काही काळ छोट्या मोटर वर फिरणार्या
घुंगरटांनी सेवा बजावली. आता आवाज रेकोर्ड करून वाजवणारे स्पीकर दिसू लागलेत,
प्रगतीच्या खुणा!
पंढरपूर ४० किमी हा बोर्ड पहिला आणि अंगात ‘उसने’ अवसान संचारले. मागून येणारी वाहने सुद्धा बर्यापैकी
शिस्तीत जात होती. रस्त्याकडील वस्तीतून लहान मुले हसर्या चेहऱ्याने हाका मारून
हात हलवीत टाटा करीत होती. फाटा सोडल्यापासून ८-१० किमी च्या अंतरात एका टपरी
बाहेरून आवाज देत एक गावकरी बाहेर आला. “माउली..सरबत घ्या सरबत”......ताक, त्यावर उसाचा रस मध्येच प्यायलेले इलेक्ट्रोल याचे विचित्र
मिश्रण पोटात झालेले होते. त्यामुळे त्याची आग्रहाची विनंती टाळली. त्याच्या
आवाजात निश्चितच व्यावसायिक बोलावणे नव्हते. पायी वारी बरोबर चालताना सुद्धा असाच
अनुभव अनेक ठिकाणी घेतला आहे.
थकलेल्या शरीरानिशी पण ताज्या मनाने सायकल मारीत ५.३० वाजता पंढरपूर पासून ५
किमी अलीकडे असलेल्या तुकारामबुवा खेडलेकर यांच्या आश्रमाशी पोचलो. तिथे
विठूरायाची उंच मूर्ती बनवलेली आहे. तिथे फोटो काढून सोशल मिडीयावर टाकला कि राईड
पूर्ण होते! १ सिग्मा चा नियम तिथेही होताच, त्यामुळे गर्दी झाली. पंक्ती प्रपंच नको म्हणून फोटो काढून “जमलं बुवा” चे
निरोप चव्हाट्यावर टाकले. मागून मित्रांचा कारवा आल्यावर पुढे निघालो आणि
पंढरपूरच्या गर्दीतून वाट काढीत भक्त निवास मध्ये पोचलो. एकादशी असल्यामुळे
मंदिरात खूप गर्दी होती. त्यामुळे थकल्या शरीराने तिथे जाणे टाळले.
बाळू पुण्याहून गाडी घेऊन आला होता. सायकली पटापट सोडविल्या आणि गाडीत टाकून
त्याला पुण्याला परत धाडले. आता आम्ही आमचा आमचा परतीचा निर्णय घ्यायला मोकळे
झालो.
श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास उत्तम, प्रशस्त व्यवस्था असलेले ठिकाण. ८ बेड
आणि ५ बेड चे कक्ष, त्याला
जोडलेली स्वच्छतागृहे, सर्वांसाठी
स्वच्छ गाद्या, उश्या आणि पांघरुणे, खूपच आरामदायी. चार दिशांनी असलेले निवासी कॉम्प्लेक्स आणि
मधोमध प्रशस्त हिरवळ, एक छानसे
स्टेज, जणू एखाद्या तारांकित
हॉटेलमध्ये आलो आहे असेच वाटावे.
सचैल स्नान करून आय.ए.एस. ने आयोजित केलेल्या उत्तम भोजनाचा आस्वाद घेऊन झोपायला
गेलो. आमच्या खोलीतील आशिष आणि योगेश पाहटे ४ वाजता पुण्याकडे सायकलवरूनच निघणार
होते. त्यामुळे सगळेच लवकर झोपलो. दिवसभराच्या श्रमांनी क्षणार्धात गाढ झोप लागली.
पहाटे हे दोघे निघाले तेव्हा त्यांना शुभेच्छा देऊन पुन्हा लगेच झोपी गेलो. ५,३० वाजताच गजर झाला. उठून आवरून एस-टी स्थानकाकडे निघालो.
पंढरपूर मधील अंतर्गत रस्त्यावरून खड्डे चुकवत रिक्षाने आम्हाला स्थानकात सोडले.
एस-टी स्थानकाची अवस्था दयनीय होती. लहानपणापासून पाहिलेली वेगवेगळ्या एस-टी
स्थानकतली अस्वच्छता तिळमात्र बदलेली नाही याचा खेद वाटला. तिथली अव्यवस्था आणि
वाटेतल्या वेळापूर- अकलूज आदि गावातली उघडी गटारे पाहताना कालच्या सायकल
प्रवासातले एक दृश्य वारंवार डोळ्यासमोर येत राहिले. गावातली घरे, लागून पडवीतले गोठे. त्या बाहेर खुंटाळी ठोकून बांधलेली
वासरे आणि रेडके. त्यांना बांधलेल्या दोरीच्या त्रिज्येचे वर्तुळ त्यांच्या शेणा
मुतीने भरलेले. त्यातच लोळल्यामुळे त्यांच्या केसाळ कांतीवर चिकटलेली शेणा-मातीची
पुटे. उन्हाच्या झळा असह्य झाल्यामुळे घरातल्या धन्याच्या दिशेने हम्बरत ती उभी.”
आत्ता मला या उन्हाच्या त्रासातून सोडव”
असे आर्जव करणारी. आपली एकूण व्यवस्था ठीक नाही इतकी समाज नसलेले हे जीव. मला
गावातल्या एकूण अव्यवस्थेशी याचे साधर्म्य वाटून गेले. थोडे बोचरे विधान आहे हे मी
जाणतो, पण माझ्या मते खरे आहे.
७.४५ वाजता पंढरपूर- अकलूज- पुणे- मुंबई सेन्ट्रल एस-टी सुटली. 2X2 आसन व्यवस्था असलेली लाल परी चांगली होती. अकलूज येताच
कंडक्टर महाशयांनी जाहीर केले हि इथून पुढे ६ सीट रिजर्वेशन आहेत त्यांनी उठावे.
संक्रांत नेमकी आमच्यावरच होती. मग उभे राहून प्रवास सुरु झाला. इंदापूर ला अजून
चौघांना उभे राहण्याची शिक्षा झाली! “ आम्हाला आधीच सांगायचे, किमान मनाची तयारी तरी केली असती” असा वाद घालून कंडक्टर
महाशयांशी शाब्दिक चकमकी घडल्या आणि निवाल्या.
आपला समाज किती सोशिक आणि सौहार्दाने भरलेला आहे त्याचे दर्शन झाले. ज्यांचे
रिजर्वेशन होते त्यांनी स्थानापन्न होताना दोघांच्या सीट वर चोरून बसत चक्क उभ्या
असणाऱ्या एकेकाला टेकण्यासाठी जागा दिली. सुरुवातीच्या तापलेल्या वातावरणावर सहज
संभाषणाचे विरजण लगेच पडले. कंडक्टर ने सुद्धा पुढे उतरणारे कोण आहेत ते पाहून उभे
असलेल्या लोकांना ‘हे उतरले कि तुम्ही तिथे बसा’ असे सांगून आणि स्वत: ची जागा
एकाला देऊन ब्राउनी पॉईंट्स मिळवले. “
हक्क” या शब्दाभोवती असलेले वलयसुद्धा किती सापेक्ष असते तेही जाणवले.
पुण्याजवळ पोहोचता पोहोचता रहदारीत अडकून बसचा वेग कमी झाला आणि शेवटी एकदाची
बस १ वाजता स्वारगेट स्थानकात पोचली आणि या वारीचा पुणे-ते-पुणे हा प्रवास संपला.
विविध अडचणींच्या पार्श्वभूमीवर इतका समृद्ध अनुभव आपल्याला घेता येईल असे वारीला
निघताना खरोखर मनास वाटले नव्हते. “ भावेविण भक्ती, भक्तीवीण मुक्ति|| बळेवीण शक्ती, बोलू नये||” ज्ञानदेवांनी लिहिलेल्या हरीपाठामधील हि ओवी.
यातले बळ मनात, हृदयात आणि शक्ती शरीरात
असते असा प्रत्यय आला.
पांडुरंग म्हणजे कृष्णाचे रूप. परंतु
कोणतेही शस्त्र हातात न घेतलेला, कोणत्याही
कल्पित असुराशी लढाई न केलेला हा देव “युगे अठ्ठावीस विटेवरी उभा| कर कटावरी
घेउनिया||” त्याने प्रत्यक्ष येऊन मोठे चमत्कार केलेले नाहीत, जे आहेत त्या त्याच्या इतर रूपातल्या कहाण्याच. तरी त्याने
मनाला वेधू का लावावे त्याचे हे एक उत्तर या प्रवासात मिळाले. वारीचा संपूर्ण
प्रवास घडताना आणि त्या आनंददायी अनुभवात आकंठ बुडताना साक्षीभाव जागृतीच्या
वाटेवरची नामदेवाची पायरी आपल्याला किमान दिसू लागली आहे असे वाटू लागले.
सत्यजित चितळे
१२ जून २०२५
#cyclewari
#cycle ride