तोच तो सूर्य तोच तो सूर्योदय:
मागे कधी एकदा माझी जन्म पत्रिका बनवून घेण्याची वेळ आली. तेव्हा जन्म वेळ
सांगावी लागली, “त्या” दिवशी मध्यान्याच्या वेळी माझा पहिला टाहो जगाने ऐकला.
हॉस्पिटलच्या प्रसूतीगृहातल्या खोलीत डोळे किलकिले करून प्रकाशाची जाणीव माझ्या
मेंदू पर्यंत पोहोचली तेव्हाच्या स्मृती माझ्या त्या वेळच्या इवल्याश्या मेंदूत
दडून बसल्या आहेत का ते माहित नाही. तसेच दिवस आणि रात्र आणि त्याचा कर्ता सूर्य
याच्याही पहिल्या स्मृती प्रकाशाच्या वाटेने मेंदूवर कुठे कोरल्या गेल्या आहेत
तेही न आठवे. कदाचित भाषेचे संस्कार तेव्हा झालेले नसल्यामुळे त्या आठवणींना मी आज
मूर्त रूप देऊ शकत नसेन.
आपण हनुमानाचा अवतार आहोत, किंवा त्याचा अंश आपल्यात आहे अशी कोणतीही समजूत
नसलेल्या मला सूर्याचे उगवते लालबुंद बिंब याचे साधर्म्य सफरचंदाशी वाटले नसणार
यात काही विशेष नाही परंतु जेव्हा केव्हा ते दर्शन झाले तेव्हा त्या दर्शनाने मला
झपाटून टाकले असणार आणि आजही झपाटले आहे हे मात्र निश्चित.
ख-गोलाच्या घुमटाची पोकळी जिथे संपते आणि पृथ्वी जिथून सुरु होते अश्या दूर
क्षितिजावरून उगवणारे सूर्य बिंब संधी मिळेल तेव्हा पहावेच. आताशा शहरातून दिसणारे
क्षितिज हे मूळ क्षितिजाच्या वर काही अंशावरून सुरु होते अन लहानपणी चित्रात काढलेला, पाहिलेला तो तेजोगोल जसा दोन डोंगराच्या मधल्या कुशीतून
किरणे फाकवत हसत उगवे ते बिंब आजकाल एखाद्या किंवा समूहाने उभारलेल्या टोलेजंग
इमारती मागून एकदम प्रखर तेजाने उगवते. असा सूर्योदय रोज ज्यांच्या नशिबात आला त्यांना
मोकळ्या वातावरणातील त्या प्रसन्न सूर्योदयाची केवळ आठवणसुद्धा खूप चैतन्य देऊन जाते.
ग्रीष्मातल्या तापलेल्या दिवसानंतर निवालेली निरभ्र पहाट, पहाटेच कुठे भटकंती
करायला बाहेर पडावे. वाटेवरचा पिवळा बहावा सुंदर दिवसाची सुरुवात करण्यासाठी
सजलेला असावा. पुढच्याच चौकातला पांगारा बहाव्यापेक्षा गडद पिवळा फुलांचा साज घेऊन
उभा असावा. सूर्योदयाला काही मिनिटे अवकाश असला तरी स्वत:भोवती दूरवर गोल रिंगण
करून आभाळाला टेकलेले भूपृष्ठ आणि त्यावर पूर्व कोणत्या दिशेला असे विचारले तर
निश्चित सांगता येणार नाही असा आकाशाचा गोल घुमट पूर्ण उजळलेला असावा. आभाळात
रात्रभर साम्राज्य गाजविलेल्या चांदण्या त्या प्रकाशात केव्हाच निद्रिस्त झालेल्या
असाव्यात. लाल तांबट पक्ष्याचा पुक-पुक आवाज कुठूनतरी घुमत यावा, कोकीळेनेही गान सुरु केलेले असावे, आणि अचानकच आभाळात तेजस्वी सूर्य बिम्बाची किनार दिसू
लागावी. झळाळती केशरी. अगदी थोड्याच वेळात अगदी कर्कटक घेऊन पूर्ण गोल काढावा इतके
नेटके गोलाकार बिंब क्षितिजावर यावे आणि लगोलग त्याकडे नुसत्या डोळ्यांनी पाहणे
अशक्य व्हावे. कधी
क्षितिजाजवळ प्रदूषणाचा करडा पट्टा दिसावा आणि त्यावर उजळलेला ख-गोल. आणि तो करडा
पट्टा भेदीत प्रदीप्त सूर्यबिंब अवतीर्ण
व्हावे, पूर्ण वर्तुळाकृती, त्याची किनार अगदी स्पष्ट असलेले. एखाद्या पवित्र
धुनितल्या तप्त निखार्यातून उडालेली राख जसा तप्त लोहाच्या रंगापासून करड्या काळपट
रंगाचा वर्णपट दाखवत पसरते तसे त्या तेजस्वी बिम्बापासून खाली क्षितिजाकडे आभाळाचे
रंग दिसावे.
सरत्या ग्रीष्मात पहाटेचे वारे सुटावे, वळवाच्या पावसासाठी समुद्रावरून त्याने
बाष्प वाहून आणावे, त्या बाष्पाचा
अदृश्य ढग दूर क्षितिजावर विसावलेला असावा आणि तो आपली नजर आणि सूर्यदेवाचा संकल्पित
उद्गम बिंदू या मध्येच यावा. आभाळात एकही ढग नसावा, असावी फक्त दूर उडत जाणारी बगळ्यांची रांग आणि इतक्यात उगवणाऱ्या सूर्याची
तबकडी त्या बाष्पाच्या ढगात विरून जावी आणि तप्त रवीच्या बिम्बाची किनार त्यामध्ये
विरघळून एखादा तप्त पुंजका तरंगत यावा तसे या रविचे नभात आगमन व्हावे. अद्भुत
तेजस्वी, फोटो काढायला जावे तरी
केवळ एक विलोभनीय तप्त वायूचा पुंजका दिसावा असे.
कधी रात्रीच्या वार्याने वाहून आणलेले ढगांचे पुंजके पूर्वेला विखुरलेले
असावे. काही भुरे काही सावळे, निरर्थक वाटावे अश्या आकाराचे, उंचीचे, लांबीचे. कधी पहाटेच दूर देशी गेलेल्या विमानाने
ओढलेली गोठलेल्या वायूंची एक पांढरी रेघ फिकट निळ्या आकाशात विरून जाण्याच्या
तयारीत असावी. एखाद्या आठवड्यापूर्वी होऊन गेलेल्या वळवाच्या पावसाने जरा हलके
झालेले तापमान पुन्हा वाढल्यामुळे आसपासच्या निसर्गात जरा सामसूमच असावी.
वाळलेल्या वनातून काळतोंड्या वानराचा हुप्प आवाज घुमत असावा. कधी दिवसाची सुरुवात
मंगलमय करणारा भारद्वाज पंख फैलावून उडताना दिसावा. दुरून मोराचा केकारव कानी
यावा. आणि हे सर्व होतानाच आभाळात स्वच्छंद विहरणाऱ्या ढगांची किनार अशी उजळावी
कि जणू त्या ढगांना कोणी आगच लावली आहे. आस्ते
कदम नारिंगी सूर्य बिम्बाचे आगमन व्हावे, ते वर वर सरकावे. त्याच्या उर्ध्व
प्रवासात क्षितिजाजवळील त्याचा रंग नारिंगीच दिसावा पण जसे वर पाहावे तशी त्याची
दीप्ती कित्येक पटींनी वाढत गेलेली दिसावी. त्याच्या अंतरंगात पेटलेला ज्वालामुखी
जाणवावा अशी.
मग पावसाळी ढगांनी आकाशात ठिय्या द्यावा. आपणापासून ते पूर्वेला उगवतीचा बिंदू
याच्याही कित्येक योजने पुढे पर्यंत कमी उंचीवरल्या ढगांची जाड दुलई पसरलेली
असावी. उगवता भानू त्यामागे लपून जावा तरी त्याची आभाच इतकी कि सगळीकडे उजेड उजेड
पसरावा. पावसाच्या थेंबांनी सजीव झालेल्या गवताची पात्यांनी आणि रान झुडुपांच्या
कोम्बांनी भुईच्या वर डोके काढलेले दिसावे. जवळच्या एखाद्या डबक्यातून बेडकांचा
कर्कश आवाज येत राहावा. “पेर्ते व्हा” ची साद पहाटेपासूनच कानी यावी. सूर्य नेमका
कुठे याचा शोध उत्तरायणातील अंतिम बिंदू पाशी नजरेने घ्यावा आणि त्याच क्षणी
ढगांच्या दुलईतून एखादा झरोका उघडावा, केवळ ईश्वरी
चमत्कार वाटावा असा तो प्रकाशाचा झोत दूरवर समोर एखाद्या टेकाडावर पडून केवळ
तिथलाच प्रदेश उजळून गेलेला दिसावा. एकदमच खिडकीचे तावदान बंद करून घ्यावे तसे
वार्याच्या फटकार्याने ढगातली ती खिडकी बंद व्हावी आणि पुन्हा ते कृष्णमेघ बरसण्यास
सज्ज व्हावे. मी आहे याचे आश्वस्त अभिवचन देऊन ती प्रकाश शलाका गायब व्हावी.
अश्विन- मार्गशीर्ष मास असावा, आता आभाळात
काळ्या कुट्ट ढगांचे साम्राज्य नसले तरी मागे रेंगाळलेले काही चुकार ढग डोंगराच्या
अंगाला बिलगून रात्र काढताना दिसावे. वार्याच्या झोता बरोबर त्याची होणारी पळापळ
पाहत राहावी. बरसलेल्या पावसाळ्यानंतर आभाळाची निळाई थोडी काकणभर निळ्या रंगाकडे
झुकली आहे असे वाटून जावे. उगवतीची पूर्वा आता बरीच दक्षिणेकडे गेलेली दिसावी.
जर्द पिवळ्या रंगाच्या तेजस्वी बटू ने मग दिवसाचे प्रथम दर्शन द्यावे. जणू बावनकशी
सोन्याचा तप्त गोळाच तो. वार्यासवे आभाळात उंची गाठत जाणारा एखादा शुभ्र ढग मध्ये
यावा आणि त्या सोन्याचा जणू पृथ्वीच्या पृष्ठापर्यंत पाऊस पडावा.
कधी त्यातल्या एखाद्या मेघाला आपल्या जवळील जलाचा अभिषेक करण्याची तल्लफ यावी
आणि त्याने तसे करताच सूर्याच्या किरणांनी त्याच्या बिन्दुंतून जात पश्चिमेच्या
दिशेने सुंदर इंद्रधनुष्य साकारावे. उगवत्या सोनेरी सूर्यानेही आपल्याच दूतांची ती
किमया कौतुकाने पाहत राहावी, क्षितिजावर वीतभर आलेले ते हसरे सूर्यबिंब आपणही सहज
नजरेत साठवू शकावे. कधी तो तेजोनिधी एखाद्या ढगामागे लपून राहावा परंतु त्या
ढगातील माफक बाष्पाच्या लोलकातून प्रकाशाचे वक्रीभवन होऊन किरणांचे लोट सर्व
दिशांना विस्तारलेले दिसावे.
गुलाबी थंडीचे दिवस, आळसावलेल्या
दिशा आणि आकाशाच्या घुमटात लुकलुकणाऱ्या स्पष्ट प्रकाश ज्योतींचे साम्राज्य
पसरलेले. पहाटेचा थंड वारा अंगावर शिरशिरी आणत वाहत विहरणारा. पृथ्वीचा धाकटा
तेजस्वी भाऊ शुक्र किंवा तापट बंधुराज मंगळ, सगळ्या ग्रहमालेत मोठा गुरु किंवा सगळ्यांना धाक दाखवणारा शनी यातला एखादा
एकटाच किंवा कोणाच्या जोडीने सूर्याच्या भेटीला येऊन गेलेले त्यांच्या त्यांच्या
अयन मार्गावर विसावलेले. कधी आई वडिलांच्या आगे मागे लुडबुड करणाऱ्या धाकट्या
भावंडाप्रमाणे भ्रमण करणारा बुधाचा ठिपका दिसावा. मोहक चंद्रकोर तिच्या तिथीनुसार तिच्या
नक्षत्रातून प्रवासास निघालेली. परंतु सगळी कडे स्तब्धता. पूर्वेला मग काही तरी
गडबड जाणवावी. क्षितिजावर लाल रंगाची किनार उमटली तरी आभाळातून लक्ष लक्ष ज्योती
अजून काढता पाय घेण्याच्या मनस्थितीत नसाव्यात. झुंजूमुंजू हा एकच शब्द ज्याचे
वर्णन करू शकेल इतका प्राचीचा लाल रंग पसरावा.
थिजलेल्या घन हवेतून सूर्याच्या प्रकाश किरणातील केवळ लाल रंगांनाच वातावरणात
प्रवेश मिळावा आणि अत्यंत लोभस अश्या सूर्य बिम्बाच्या वर्तुळाच्या जीवेचे
क्षितिजाच्या कितीतरी वर आगमन व्हावे. त्याचे अंग लोभस तेजस्वी असले तरी सोबतीला
असलेला किरणांची प्रभावळ मागे सोडून ते लांबवर्तुळाकृती बिंब पूर्णत: त्या
आळसावलेल्या कृष्ण रंगी क्षितिजावर दाखल व्हावे. पूर्ण बिंब दिसू लागले तरी आभाळात
उंचीवर दिसणाऱ्या शुक्र, किंवा गुरूने
अजून रजा घेतलेली नसावी. झूम लेन्स ने रोखून पाहता सूर्याच्या विषुववृत्तावर
काजळाची तीट लावावी असे सौर डाग दिसावे. कधी ते इतके स्पष्ट कि नुसत्या
डोळ्यांनीही जाणवावे. कधी त्याची किनार कातरलेली भासावी, इतकी कि वाटावे सूर्याच्या
धगधगत्या पृष्ठावर मैलोगणती उठणाऱ्या ज्वालाच आपण पाहत आहोत. कधी त्या बिम्बावर
त्याच लोभस तांबूस रंग छटांचे आडवे पट्टे दिसावे, काही अधिक प्रखर तर काही तुलनेने
निवलेले.
केव्हा केव्हा आभाळात उंचावर ढगांची नाजूक शाल पसरलेली असावी आणि उगवत्या
तांबूस किरणांनी त्या पिंजून भिरकावून दिलेल्या घनांना आपल्या रंगात माखून उजळवून
टाकावे. जणू गुलाबी थंडीत कोणी ती तेजस्वी लाल नारिंगी दुलई घेऊन निजले असावे.
सजीव सृष्टीचा तारक जो सूर्य त्याची हि भावलेली रूपे. तांबडा ते जांभळा या
दृश्य वर्णपटात प्रामुख्याने केवळ उष्ण रंगाच्या विविध छटांनी वर्णन करता येतील
असे त्याचे रूप हर दिवशी हर घडी वेगळे भासणारे. क्षणोक्षणी अंशा-अंशाने फिरणारी
बहुरत्ना वसुंधरा, बेफाम वाहणारा
वारा आणि त्यावर विहार करणारे ढगांचे पुंजके यांनी उगवत्या सूर्याचे भासमान रूप
अक्षरश: क्षणोक्षणी बदलत राहते. ते चालत चित्र बघतच राहण्याचा मोह आवरत नाही हे
खरे.
कविवर्य कुरुमाग्रजांनी कल्पिलेल्या त्या तेजोगोलाच्या प्रेयसी पृथ्वीवरचे आपण
निवासी. तिच्या वातावरणाच्या पदरातून दिसणारी सूर्याची लोभस, तेजस्वी रूपे आणि त्यांना माणसानेच दिलेली बारा
प्रचलित नावे. प्रत्येक नाव या तेजस्वी अग्निगोलाचे मनुष्यास भासमान स्वभाव
दर्शविणारे. मित्र, रवी सूर्य, भानू, खग, पुष्य, हिरण्यगर्भ, मरीची, आदित्य, सविता, अर्क आणि
भास्कर या बारा नावातील तेज आणि प्रखरता हे दोन गुण गाळून बाजूला ठेवले तर
त्याच्या वर्णनातील इतर स्वभाव छटा त्याच्या त्या त्या दिवसातील भासमान सौंदर्याच्या
चपखल वर्णन कर्त्या होतात असे लक्षात आले.
त्याचा अखंडित चाललेला प्रवास, त्याच्या प्रवासात त्याच्या मागून धावणारा नक्षत्रांचा
पट आणि त्यांचा ठराविक कालखंड याचे गणित मांडून बारा राशीत झालेली त्या मार्गाची
वाटणी. त्या त्या राशी सापेक्ष त्याचे होणारे स्थान बदल, त्या वेळचा पृथ्वीच्या
उत्तर गोलार्धातला ऋतू, हे सगळ सगळ जुळते असे थोड्या अभ्यासातून लक्षात
आले.
माणसाच्या दृष्टीपटलातून मेंदू पर्यंत पोचणारा सूर्य प्रकाशाचा
स्पेक्ट्रोग्राफ आणि सूर्योदयाच्या वेळेची हवेची घनता, बाष्पाचे प्रमाण, वातावरणातील धूळ, वार्याचा वेग आणि दिशा याचा तौलनिक झालेला अभ्यास याची
सांगड घालत या सर्व दृश्यांची वैज्ञानिक उकल वैज्ञानिकांनी शक्य केली आहे.
म्हणूनच सूर्याचे हे भासमान स्वभाव विशेष केवळ कवी कल्पना म्हणून सोडून द्यावे
असे मला वाटत नाही. “तो असे का वागला असेल” हा जो यक्ष प्रश्न मानव संबंधात पडत
राहतो, तो तसाच या नात्यालाही लावता
आणि खोलात अभ्यास करता त्याचे शास्त्रीय विवेचन समोर येते. अर्थात त्याने त्याचे
क्षणिक सौंदर्य आणि त्याने मनाला घातलेली मोहिनी काही कमी होत नाही! मानवी
क्षमतेच्या “मी पावसाळे अनुभवले आहेत” या वर्णनाबरोबरच मी सूर्योदय “पाहिले” आहेत
हेही मला तितकेच महत्वाचे वाटते!
सत्यजित चितळे
९ मे २०२५