Saturday, October 26, 2024

झुंजार वाडा - कळकीचे मेट- झुंजार बुरुज

 

झुंजार वाडा, शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्र देशात कोणतीही जागा या नावाने खपून जाईल. तरी असा एक वाडा खरोखरच आहे. सिंहगडाच्या कुशीत, पाबे घाटाच्या चढावाच्या अंगाला, खरमरी गावाच्या उतरंडीला. त्याचा शोध मंदार ने इंटर नेट वरच्या माहितीच्या आधारे लावला आणि तो तिथे जाऊनही आला. एकटेच भटकंती केलेल्या या परिसरात आपल्या समान-शील मित्रांनाही न्यावे असा त्याचा ध्यास आम्हाला इथे घेऊन गेला.

२४ ऑक्टोबर च्या पहाटे ४.३० वाजता पुण्यातून एका गाडीने मंदार, मनोज, गायत्री, रवी आणि मी असे पाच जण निघालो. गाडीने सिंहगड रस्त्यावर डोणजे गावाकडून आतकरवाडी कडे जाणारी वाट सोडून उजवीकडे पानशेत कडे वळण घेतले. डावीकडे गडाच्या टीव्ही टॉवर वरचे लाल दिवे स्पष्ट दिसत होते. खानापूर मागे टाकून पुढच्या वळणाला पाबे घाटाकडे लागलो. या परिसरात वास्तव्य असलेल्या  आणि सर्वांच्या मनात घर करून राहिलेल्या बिबट्याच्या घराच्या अंगणात जाऊन येण्याचा ट्रेक होता आणि त्याचीच चर्चा आमच्यात रंगली होती.

झुंजार वाडा हे कर्नल पुरोहित यांनी नूतनीकरण करून बांधलेले ठिकाण. तिथे पूर्व परवानगीने गाडी लावली, पहाटेचे साडेपाच वाजले होते आणि अजून चांगलाच अंधार होता. खालच्या वाडीतल्या मंदिरात काकड च्या आधीची भजने सुरु झालेली होती. गडाची किनार अंधारात दिसत नव्हती पण हा इथला आदिपुरुष कोणत्या दिशेला असेल ते सांगता येत होते. चढाचा रस्ता दिसत नव्हता. मग मंदार सांगेल त्या दिशेला तोंड करून टॉर्च च्या प्रकाशात जंगलात घुसलो.

सागाचे जंगल त्यात वाढलेली झुडुपे, ऑक्टोबर महिना संपायला आला तरी पडत राहिलेल्या पावसामुळे झालेला थोडासा चिखल आणि टॉर्च दाखवेल तेवढीच चतकोर भूमी, त्यात “ हा रस्ता चुकतोय बहुतेक” म्हणत बदललेली दिशा आणि थोड्याच वेळात आपण मगाशी होतो तिथेच आलो आहोत हे ज्ञान झालेले....चकवा लागला बहुतेक असे मनात आले. भूता खेतांच्या गोष्टीची आठवण झाली आणि कुठून पायीच्या घुंगुरांचा आवाज येतोय का इकडे कान टवकारले गेले.

“दिसणाऱ्या” वाटेवरच्या चकव्याचा पहिलाच अनुभव. खरे तर “वाट” चुकवत नाही, परंतु मनच चकवते. आपलीच खात्री न वाटून उगाच वेगवेगळे विकल्प समोर ठेवते. त्याला उपाय एकच, एक दिशा ठरवणे आणि त्या दिशेला सरळ चालत राहणे. मग मार्ग लांबचा का ठरेना, चुकत मात्र नाही!

थोड्याच पावलात दिशा गवसली आणि झाडोर्याचा तो पहिला टप्पा ओलांडून एका कमी चढाच्या पठाराला लागलो. त्यापुढे एक चढाचा टप्पा लागला. कंबरे एव्हढे, कधी छाती इतके उंच वाढलेल्या गवताने मुळात पुसट असलेली वाट पार पुसून टाकलेली. त्यातून मार्ग काढायचा. इतक्या उंचीचे गवत म्हणजे काय खायची गोष्ट आहे? या प्रश्नाचे उत्तर आम्ही माणसे असल्यामुळे “ नाही” असेच होते!


मग त्या वाटेवर पाऊल “घातले”; सामान्यत: वाटेवर पाउल ठेवले असे म्हणायला हवे, पण वारेमाप वाढलेली झुडुपे आणि गवत याने आच्छादिलेल्या अदृश्य वाटेवर पाउल घातल्या शिवाय जमिनीवर ठेवणे शक्यच नव्हते.

तुऱ्याला आलेले ते गवत आमच्या वजनाने भुई सपाट होत आम्हाला मार्ग करून देत होते. भुईवर सपशेल लोटांगण घेतलेले हे गवत पुन्हा उभे राहणार नव्हते. परतून येताना त्यामुळेच आम्हाला मार्ग सापडणार होता. या गवताचे आणि त्याच्या सम्भारात जमिनीवर निर्भय वावरणाऱ्या कृमी-कीटक आणि भूचरांचे आयुष्य आमच्या निर्दय पदभ्रमणाने  संपुष्टात येणार म्हणून थोडे वाईट वाटले.

हि डोंगराची सोंड चढून जातो तोवर उजाडले आणि सगळा परिसर दिसू लागला. संपूर्ण डोंगर पूर्ण हिरवाईने नटलेला. औषधालाही माती चा रंग दृष्टीस पडत नव्हता. कुठे सागाची मोठ्या पराती इतका पर्ण संभार वाहणारी झाडे, मुरमाड डोंगर उतारावर बेफाम वाढलेले गवत, मधूनच दिसणारी आपट्याची रोपे डोंगर सोंडेच्या मध्य भागेवर रिंगण धरून वाढलेली कारवीची झुडुपे, या सोंडेच्या पश्चिमेकडे असलेल्या घळीतून खळखळत वाहणारा शुभ्र जलप्रपात असे मोहक वातावरण होते.  

पुढची वाट या कारवीच्या बनातून निघाली. कारवीचा फुलोरा आता संपत आला होता आणि त्याची बोंडे बीज संवर्धन करीत सुंदर मखमली गुलाबी- राणी रंगात माखून निघालेली होती.

 


वाट मधूनच गायब होत होती. एके ठिकाणी वाट काढण्याच्या प्रयत्नात वाटेवर विसावलेला आणि तसे “शिळा” झालेला मोठ्ठा धोंडा पायाखालून निघाला आणि त्याने खाली जाताना चांगलीच गती पकडली. सुदैवाने तो मागून येणाऱ्या मनोज च्या बाजूने गेला आणि अनर्थ टळला. 

कारवीचे जंगल मागे पडले आणि आम्ही कळकीच्या मेटावर पोचलो. दुरूनच चाहूल घेऊन तिथल्या श्वानाने भुंकून आमचे स्वागत केले. तितक्यात आलेल्या वाऱ्याच्या मंद झुळुकीने आमच्या सद्गुणांचा वास लवकरच त्याच्याकडे पोचता केला असावा कारण त्याच्या स्वरातील तिखटपणा गायब होऊन त्याची जागा कुतुहलाने घेतली असावी असा त्याचा स्वर झाला.

कळकीचे मेट, किंवा कळके वाडी किंवा कोळी वाडा त्याला काही म्हणा, चार उंबरठ्याची वस्ती. चौरस जोत्यावर चारी बाजूने दगडा मातीच्या भिंती आणि उताराची पाला पाचोळा आणि फ्लेक्स च्या कापडाने आच्छादलेली घरे. घरांच्या आत किंवा पडवीतच गोठा, त्यातून उठणारा गुरांच्या गळ्यातील घंटांचा मधुर नाद. माणसाची मात्र चाहूल नाही. या कोळीवाड्यात फक्त गुरे बांधण्याची जागा असावी बहुतेक असे म्हणत आम्ही डावीकडे मोर्चा वळवला. 


 गडाच्या भिंतीवरून उगम पावणारे ओहोळ पाण्यासाठी जुजबी अडवून जनावरांना पाण्यासाठी केलेली सोय निरखीत ते ओहोळ ओलांडून जात होतो.  आसपासच्या कारवीच्या आणि रान फुलांच्या सुबक नाजूक अंगावर उतरून त्यातील मध गोळा करणाऱ्या कामकरी गांधील माश्या इथे जवळच त्यांचे वसती स्थान असल्याची खूण करून देत होत्या. त्याचा पत्ता मंदार ने आधीच काढून ठेवला होता. थोड्या दूरच्या झाडावर लटकलेले मोठ्ठे पोळे मंदारने दाखवले. त्या कष्टकरी कीटक समूहाचे आमच्याकडे लक्षच नव्हते त्यामुळे काहीच धोका नव्हता. 

आम्ही आता गडाच्या कंबरेच्या भागातील सपाटीवर होतो. उत्तर-पश्चिमेकडे वाऱ्याच्या वाटेवरचे मेट दिसत होते. आणि समोर सिंहगडाची बेलाग भिंत पश्चिमेकडे तोंड करून उभी ठाकली होती. डोणागिरीच्या कड्याची विस्तीर्ण घळ आणि त्याच्या पोटातला द्रोणा सारखा आकार या उंचीपासून थेट कातळ कडा दुर्लंघ्य करणाऱ्या तटबंदी पर्यंत दिसत होता. ४ फेब्रुवारी १६७० च्या मध्य रात्री न भूतो असा तो पराक्रम करणारे मावळे तानाजी मालुसरेंच्या  बरोबर याच परिसरातून गेले असतील हे आठवून अंगावर रोमांच उभे राहिले. या परिसरात भटकंती कशासाठी? या प्रश्नाचे पूर्वी सुचलेले उत्तर पुन्हा माझ्या मनाच्या पटला वर तरळून गेले. त्या असामान्य पराक्रम करणाऱ्या पूर्वजांच्या श्वासातून बाहेर पडलेला एखादा तरी रेणू इथे रेंगाळला असेल, तो वेचता आला तरी......

 थोड्याच अंतरावर वाढलेल्या गवतातून डोकावणारे वीरगळ दिसले. इस्लामी बांधणीचे आणि कमळपुष्पा सारखे घुमट असलेले ते वीरगळ इतिहासातल्या कोणत्या काल खंडात पराक्रम गाजवलेल्या कोणत्या वीरांचे आहेत त्यांची नावे आता माहित नाहीत. त्यांच्या स्मृतीचा चिरा आहे पण तिथे त्यांच्यासाठी अश्रू ढाळणारे आणि पणती लावणारेही काळाच्या उदरात गडप झाले आहेत. त्या अनामिक शूर वीरांच्या अस्तित्वाच्या खुणा पाहताना अंतर्मनात एक वेगळ्याच अभिमानाचे स्पंदन जाणवले. सामरिक दृष्ट्‍या त्या कालखंडात महत्वाच्या असलेल्या सिंहगडचा संपूर्ण घेर हा जागता ठेवणाऱ्या आणि त्यासाठी सर्वोच्च त्याग करणाऱ्या वीरांचे हे शेवटचे वसती स्थान, इथे येणाऱ्या प्रत्येकाला त्यांचे रंग, रूप आणि नाव न दिसताच प्रचंड ऊर्जा देणारे.



उताराच्या बाजूला एक छोटीशी घुमटी, तीवर टांगलेली एक छोटीशी घंटा आणि आत विसावलेल्या विष्णू आणि लक्ष्मीच्या मूर्ती. धोतराचे अधरीय नेसलेल्या विष्णूमूर्तीच्या डाव्या खांद्यावरून रुळणारे याद्नोपवित, मागील दोन हातात असलेले शंख आणि चक्र तर समोरच्या दोन हातात आडवा धरलेला नाग अशी प्रसन्न मूर्ती. तिच्या डाव्या हाताला दिवा लावण्यासाठी दगडात कोरलेली पणती आणि उजवी कडे चक्क पाच वारी साडी नेसलेली लक्ष्मीची मूर्ती. दोन्ही मूर्ती तुलनेने अलीकडच्या काळातल्या असाव्यात. मागच्या दरीतून काकड आरतीचा येणारा आवाज त्याला घुमणार्या मृदुंगाची साथ असे निर्मळ भारावून टाकणारे वातावरण अनुभवले.




इथले निवासी शेती करणारे,

कठीण प्रसंगी हातात शस्त्र घेऊन लढणारे परंतु तितकेच भाविक. वारकरी संप्रदाय या महाराष्ट्राच्या मातीत खोलवर रुजलाय याची खूण अश्या अनगड वाटेवरच्या या मूर्ती देत होत्या.

या घुमटीच्या डावीकडे बेसाल्ट च्या सपाट कातळात कोरून काढलेली देवाधिदेव महादेवाची पिंडी. त्यावरील शाळीग्राम वेगळा, ऊन, वारा आणि पाऊस यांचा मारा झेलून त्याचा गूळगुळीत पणा हरवून बसलेला. हलाहल पचवून होणारा त्याचा दाह कमी होण्यासाठी करायचा अभिषेक करायला इथे वर छप्पर तर सोडा पण साधी तुळई सुद्धा नव्हती. मग पिंडीच्या मागून येणारा पाण्याचा ओहोळ कोरून इथे आणलेला.



समोर एका कोनाड्यात बसविलेली शेंदुराने भाळावर लाल ठिपका रंगविलेली एक छोटी गणेश मूर्ती आणि एक नंदी. उघड्यावरच्या वातावरणाचे आघात सोसत मूळ अंगाचा सुबकपणा पावसाळ्यातल्या जल धारांसावे वाहून गेलेला. या तात्पुरत्या निवार्या शेजारी ठेवलेली थोडी मोठी नंदी मूर्ती. थोडी अधिक सुबक, मुडपलेल्या मागच्या पायाचे खूर व्यवस्थित दृगोच्चर होणारी. तिचा कोणी अधमाने शिरच्छेद केला असावा. परंतु इथल्या भूमी पुत्राने त्या नंदीला शंकराकडे पाहत स्थानापन्न केलंय, हाही याचे हे शौष्ठव ऊन-पावसाला बहाल करेल पुढच्या काही दशकात आणि मग उरतील त्याच्या अस्तित्वाचा अंदाज याव्या इतक्याच पाषाण खुणा फक्त.


 

आपल्याच पूर्वजांच्या अस्तित्वाच्या या खुणा पाहून मग अर्ध वृत्त करून पुन्हा कळकीच्या मेटाकडे परतलो. 


समोर उंचावर झुंजार बुरुजाची किनार रेषा आणि त्याखालून कापून काढलेला कडा सुंदर दिसत होता.



 तसे पाहता हे अंतर खूप वाटत होते. मेटावरच्या वीरनाथाच्या मंदिरासमोरच्या उंच काठीवर डौलाने फडकणारा भगवा जरी पटका लक्ष वेधी होता. कळकीच्या मेटावरल्या वस्तीवर जाग आली होती. गुरांना चरायला सोडल्यामुळे ती वरच्या वावरात पोटपूजा करीत होती. त्यांच्या मालकांशिवाय इथे कोणा स्त्री-पुरुषांचे पाउल सहसा पडत नसावे. त्यामुळे आमची चाहूल लागताच गाई आणि म्हशी आमचा अंदाज घेत आमच्यावर नजर ठेवीत सावध पवित्रा घेत उभ्या राहिल्या. त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत वीरनाथ मंदिराच्या उजवीकडे जाणारी वाट धरून आम्ही चढायला सुरुवात केली तोच पाठून हाळी  आली. वाट चुकणार होती, खाली वाडीतून इथल्या जागल्याने तसे ओरडून सांगितले आणि डावीकडून निघा असे सांगून आम्हाला बरोबर वाटेला लावले. इथून पुढे चांगली चढाची वाट सुरु झाली. काही ठिकाणी वाटेवरच्या कातळावर शेवाळे वाढल्यामुळे चांगलीच घसरडी झाली होती. मुरमाड वाटेच्या काठावर वाढलेल्या सोनकीच्या पिवळ्या फुलांच्या गुच्छांनी स्वागत केले, पाठोपाठ पूर्ण फुललेली स्वच्छ पांढरी कोरांटी आणि मधूनच दिसणारी लाल चुटूक गुंजेची फळे लक्ष वेधून घेत होती.

 


 सुमारे २० मिनिटांचा चढाव चढून गेल्यावर डावीकडे झुंजार बुरुजाकडे जात वाट पठारावर पोचली आणि सिंहगड -राजगड वाटेला जाऊन मिळाली. मग गडाकडे मोर्चा वळवला. झुंजार बुरुजावर भल्या सकाळी गड पाहायला येणार्‍यांपैकी कोणी बसून आम्हाला हाळी दिली. इथून माची ची उभी चढण चढून आम्ही १० मिनिटात गडाच्या बांधीव तटबंदीच्या आत प्रवेश केला आणि बुरुजावर जाऊन चढाई संपल्याचे जाहीर केले. बुरुजाच्या टोकावरून पश्चिमेला खाली कळकीचे मेट, आणि तिथून येणाऱ्या वाटेवर पडलेली बुरुजाची टोकदार सावली दिसत होती.


समोर राजगडाकडे जाणारी वाट गवताने पूर्ण अच्छाद्लेली, सकाळच्या कोवळ्या उन्हात सोनेरी चमचमणारी अतिशय लोभस दिसत होती.



८.३० वाजता उतरायला सुरुवात करायचा स्वत: चा आदेश पळून मग आल्या वाटेने मागे फिरलो. चढून येताना वाटले तितके उतरताना निसरड्या वाटेचा त्रास जाणवला नाही. सुमारे अर्ध्या तासात पुन्हा मेटावर आलो. तोवर इथले मानवी व्यवहार सुरु झालेले होते. वीरनाथाच्या मंदिराच्या ओट्यावर आलो तो समोरच्या झापाच्या बुटक्या दारातून वाकून एक विशीतला तरुण बाहेर पडला.   

चांगलीशी जीन्स ची पॅन्ट घातलेल्या त्याने त्याच्या माउलीच्या कोणत्याश्या प्रश्नावर “ कोणत्या साईडला? या दिलेल्या उत्तराचा बाज हा शहरी वळणाचा होता. आताशा इथून जवळ पोचलेल्या आधुनिक शिक्षणामुळे हा बदल घडला असेल निश्चित.  पुण्यासारख्या मोठ्या शहराजवळ, शहरात आवश्यक समजल्या जाणाऱ्या जीवनावश्यक गरजांना संपूर्ण फाटा देऊन इथेही समाधानी जीवन नांदते आहे. “तुम्ही सुखी – समाधानी आहात का?” या प्रश्नाचे “हो” असे उत्तर येण्याची जितके टक्के शक्यता शहरातल्या सर्व्हे ची असेल तशीच, आणि तितकीच शक्यता इथे असल्यामुळे असा प्रश्न विचारणे असे कुठेच प्रशस्त वाटत नाही. तरी शहरातील सहज आयुष्याच्या मानाने खडतर असे दिनमान स्वीकारून अन्यथा कोण कशाला इथे राहील? मेटावरची कुटुंबे आणि पुण्यातील लोक यांचे आयुष्य तुलना करण्यासारखे नाहीच मुळी. जवळच नैसर्गिक रित्या  फुललेल्या टवटवीत अॅस्टर कुलातील भगव्या फुलांचा ताटवा लक्ष वेधून घेत होता. खूप दुरून कॅमेरा त्यांच्या कडे रोखला. झूम लेन्स ला मनातील भावना समजल्या असाव्यात इतके त्यातले एक सुंदर फूल पूर्ण फोकस झाले नि अलगद कॅमेर्यात कैद झाले.


या फुलझाडांचे बीज इथे कोणी रुजवले काय सांगावे. परंतु इथल्या वातावरणाशी ती समरस झालेली आहेत. त्यांची शहरातल्या आखीव रेखीव बागेत फुलणाऱ्या गुलाबाशी तुलना का करावी? दोघांचे फुलणे आणि इतरांना आनंद देणे हेच महत्वाचे.

मग आल्या वाटेने थोडे घसरत थोडे तोल सांभाळत उतरणे सुरु झाले. पहाटेचा चकवा जिथे लागला तो भाग पूर्ण प्रकाशात तसाच दिसत होता जसा पहाटे च्या अंधारात विजेरीच्या प्रकाशात दिसला होता! दिसू शकणाऱ्या वाटेवरचा चकवा.....न दिसणाऱ्या वाटेवरच्या चकव्यालाही हेच नियम लागू असतात का? असा प्रश्न पडला.


गाडीपाशी पोचलो, समोरचा झुंजार वाडा आणि त्यासमोरचा ध्वज स्तंभ दिमाखात उभा होता. पहाटे ५.३० ला सुरु केलेली पायपीट ४ तासांनी संपली होती एक मनस्वी समाधान देऊन.

 

सत्यजित चितळे

२६ ऑक्टोबर २०२४

1 comment: