Tuesday, May 3, 2022

बा कांचना!

 


बा कांचना!

मला आठवत तीन वर्षापूर्वी तुला मी पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच तुझं वेगळेपण उठून दिसल होत. डोंगराच्या मध्यावरच्या खापरासारख्या फुटणार्या मुरमाड जमीन उतारावर एका अगदी छोट्याश्या सपाटीवर कोणी अनामिकान तुझं इवलस रोप चांगला खड्डा घेऊन माती भरून लावल होत. तो अनामिक असला तरी मोठ्या मनाचा आहे नक्कीच कारण त्यान तिथे स्वत:च नाव लावल नाही ‘ झाडांना पाणी द्या इतकाच लाल-हिरव्या रंगाचा फलक लावला. तुझ्या ईवल्याश्या जीवाच्या दोन काड्या, सुमारे फुटभर उंचीच्या आणि त्यावर फुटलेली सात आठ द्विद्लासारखी पाने तुझे कांचन हे नाव ओळखू यायला पुरेशी होती.

वास्तविक अश्या मुरमाड उतारावर काहीच उगवू नये, उगवली तर करवंद, घाणेरीची रोप, पावसाळ्यात उगवणारी मिकी माउस, सोनकी ची रोपटी किंवा जिथे तिथे पसरत जाणारे कोसमोस चे गवत. अश्या या परिसरात तुझे दिसणे हे अर्थातच वेगळे होते.

त्या दिवसानंतर अगदी आठवड्यातच या रुक्ष आणि कोरड्या वातावरणात तुझ्या अंगावरची हिरवी पान वाळून गळून गेली. आज तीन वर्षांनी तर ती पाणी द्या म्हणणारी खुणेची पाटीसुद्धा उडून गेलीय, उरलाय तो दोरा जयान तुझ्या शरीराच्या दोन काड्या अजूनही एकत्र बांधून ठेवल्या आहेत. कोणत्या तरी चांगल्याश्या नर्सरीतून अचानक इथे अश्या उतारावर, मुरमाड जमिनीत तू आलास, तुला खूप एकट वाटलं असेल नाही? आसपासच्या करवंदाच्या जून झालेल्या पीळवटलेल्या फांदीवरल्या टवटवीत हिरव्या पानांना तुझे असे आकारण वाळणे हा गमतीचा भाग वाटला असेल नाही? वसंतात येणाऱ्या करवंदाच्या पांढऱ्या चांदणी सारख्या फुलांनी मंद सुवास पसरवत तुझ्या निष्पर्ण देहाची चेष्टाच केली असेल नाही? त्यांना तू सांगूही शकला नसशील कि तुझी गुलाबी फुले किती सुंदर दिसतात ते! अर्थात तू सांगितले असतेस तरी तुझ्या एवढ्याश्या देहावरून आणि सुकून गेलेल्या फांदीवरून कोणी त्यावर विश्वास कसा ठेवावा ? हफ्त्या दर हफ्त्यात आठवणीने थांबून तुला पाणी देणाऱ्या सहृदय माणसांकडे पाहून हि करवंदी, घाणेरी ची झुडपं कडाकडा बोट मोडत असतील नाही!

पावसाच्या आगमनापूर्वी येणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्याला मात्र तू काही अटकाव केला नसशील. त्याच्या वाटे आडवे घालायला तुझा पर्णसंभार मुळात होता तरी कुठे ?मुसळधार पावसात उतरंडीवरून वाहणारे गढूळ ओहोळ तुझ्या भोवतीच्या मातीत भोवरा करून थोडी माती घेऊन पळाले असतील तेही तू पाहिले असशील, अर्थात तुझ्या असण्याची त्यांनी दखल घ्यावी इतके तुझे असणे नजरेत भरणारे उरलेच नव्हते म्हणूनही असेल. पण त्यातून निर्मिलेल्या खड्यांतून पाणी खोलवर दगडात झिरपायला मदत होतेय हे पाहून आणि समजून तू नक्कीच आनंदला असशील ना?  खरच सांग रे या दिवसात तू पुढच्या कोरड्या हिवाळ्यासाठी आणि तप्त कोरड्या उन्हाळ्यासाठी भरभरून पाणी भरून ठेवलेस का रे?

आसपास वाढणाऱ्या गवतातून तुझे असणे लपून गेले त्या दिवसात, तुला म्हणून घातलेल्या सुपीक काळ्या मातीतले जीवनसत्व थोडे थोडे त्या उपटसुंभ गवतानेच वाटून खाल्ले तुझी खिल्ली उडवत खरंय ना?

फाल्गुनाच्या सरत्या दिवसात कुठून तरी उडत आलेल्या एका ठिणगीने डोंगर उतारावर वाळलेल्या गवताच्या पात्याच्या घास घेतला आणि उतारावर वणवा लागला. वणव्याच्या आगीची रेष अगदी तुझ्यापर्यंत येऊन पोचली तेव्हा तू होरपळलास का रे? त्याच्या असह्य धगीमुळे सैरावैरा पळणारे कृमी कीटक आणि प्राणी यांची घालमेल तू बघितलीस का रे? त्या धगीतून तू वाचलास का नाही हे पाहायला आलेल्या तुझ्या चाहत्यांनी तुझे खुरटलेले काटकुळे अंग मोडून पहायचा प्रयत्न केला तेव्हा ‘ मी आहे जिवंत अजून हे तू ओरडून सांगितलेस का रे?

गेल्या वर्षी माणसाच्या जगात थोडा गोंधळ झाला, बराच काळ तुला भेटायला, घोट दोन घोट पाणी द्यायला कोणी आले नसेल तेव्हा आपण एकटेच पडलो असे तुला वाटले नसेल का रे?

दोन वर्षे इतक्या प्रतिकूल परिस्थितीत केवळ दोन काटक्यासारख्या शरीराने तू टिकून राहिलास, तुझे इथे असणे बहुतेकांनी नाकारलेच. पावसाळ्यात झाड-झाडोरा उगवतो  आणि वाळून जाऊन पुन्हा येतो त्याची गणती कशाला? याच न्यायान कोणी तुझ्याकडे लक्षही दिले नाही.अनेक फुले फुलती, फुलोनिया सुकोनी जाती, कोणी त्यांची महती गणती केली असे.....हेच खरे! हप्त्या हप्त्यान तुला थोड थोडं पाणी देणारे गडकरी जीव मात्र कणव करत तुला भेटत राहिले, तुझ्या पुनरागमनाची इच्छा उराशी बाळगत.

बा कांचना या वर्षी मात्र एप्रिलच्या सरत्या आठवड्यात तेव्हा तुझ्या मुळाशी जर्द हिरव्या रंगाचा कोंब मोठ्या उत्साहाने आभाळाकडे डोकावताना दिसला हे पाहून जो आनंद झाला तो केवळ अवर्णनीय ठरला. जगण्याची, फुलण्याची आणि बहरण्याची असामान्य असलेली इतकी उर्मी आणि ऊर्जा तू तुझ्या इतक्या छोट्या देहात साठवून ठेवलीस तरी कुठे? हळू हळू तापणारि उन्हे, तरीही पहाटे गार असणारा शीतल वारा, रात्रीच्या गडद अंधारात आपल्याशीच कुजबूज करणाऱ्या असंख्य तारका, मधूनच येणारी वार्याची झुळूक आणि उंचावरून तरंगत जाणारे थोडेसे ढग, त्यातून पडणारा थोडासा शिडकावा यांनी तुला वसंत ऋतूच्या आगमनाची वर्दी दिली असेल. पण नवनिर्मिती करण्याची उमेद तुला देणारा कोणी दुसराच होता नक्कीच! तुला आठवणीने पाण्याचे दोन घोट आठवड्यात देऊन जाणाऱ्या आमच्या सारख्या गडकर्‍यांमधला ‘माझ्यामुळे हा अभिनिवेश मात्र तू या एकाच उर्मीने पुसून टाकलास.

गिर्यारोहण म्हणजे आपला व्यायाम आणि आनंद या एकाच स्वार्थी आयामाच्या पलीकडे जाऊन त्याला एक वेगळा आयाम देणाऱ्या बा कांचना आता इच्छा आहे तुला छान बहरलेला पाहण्याची. तो पर्यंत आणि त्यानंतरही भेटत राहूच.

सत्यजित चितळे

२ मे २०२२

 

तोरणा - राजगड ट्रेक- डिसेम्बर २०२१

 

तोरण्याच्या तीव्र उतार संपून आपण रिज वर येतो आणि मागे अवाढव्य पसरलेला तोरण्याच्या विस्तार परत परत वळून बघत राजगडाकडे मार्गस्थ होतो. गांडुळे आणि कृमींच्या घरट्याच्या  रूपाने भुसभुशीत झालेली माती उघड्या डोंगरावर दिसत असते. मग जंगलाचा भाग सुरु होतो. बुधला माची सोडल्यावर सुमारे एक सव्वा तासाने जंगलातून वाट कचरे यांच्या घरासमोर प्रकटते. स्वप्नात असावे असे उतरत्या छपरांचे घर. समोर सरावलेले अंगण, पाच पंचवीस कोंबड्या, गाई-गुरे. इथे क्षणभर विश्रांती, चहा, सरबत, टाक घ्यावे. कचरे दादा मग अभिप्रायांची एक वही समोर टाकतात. या वाटेन पाय पीट केलेल्या भटक्यांनी त्यांच्या अनुभवांची कथा त्यात थोडक्या शब्दात लिहिलेली असते. लॉईड्स रजिस्टर ऑफ शिपिंग ची सुरुवात लंडन मध्ये अश्याच एका रजिस्टर पासून सुरु झाली असे म्हणतात. न जाणो, ट्रेकिंग च्या विश्वात असे कचरे दादांचे रजिस्टर पुढे नावारूपाला येईल म्हणून आपला अभिप्राय नावासहित तिथे नोंदवण्याचा कार्यक्रम होईपर्यंत समोर ताक/चहा आलेला असतो. शनिवार-रविवार या मार्गाने भटके लोक जास्त, त्यातला एखादा ग्रुप इथे भेटतो. कोणाला अभिनिवेश असतो आपल्या फिटनेस चा तर कोणी निसर्गाचा आस्वाद घेत निवांतपणे जाणारा.

कचरे काकांचे घर मागे सोडून निघालो कि तासाभरात जंगलात स्वच्छ सरावलेली एक मोकळी जागा येते. सुमारे २० बाय २० या जागेवर उंच झाडांनी सावली धरलेली आहे. दक्षिणेच्या बाजूला मांडलेले पाच-सहा शेंदूर फसलेले दगड इथल्या स्थानिकांची श्रद्धास्थानं, तिथे शिरतानाच वाटेत एक चिमुरडी हातातल्या पेल्यात लिंबू सरबत घेऊन उभी असते, तिच्या मागून तिची आजी असते. ‘ दादा भवानी करा, आज इथून लोक गेले पण कुणीच काही घेतले नाही असे आर्जव आजी करते. यातले काहीच त्या चिमुरडीला कळत नसते. नवखा भटका माणूस या आवाहनाला भुलून जायचा. पण हे इथले एक स्टॅनडर्ड सेलिंग स्टेटमेंट आहे हे एक दोन वेळेला गेल्यावर समजते. कमाई च प्रमुख साधन शेती, आणि पर्यटन हा जोड धंदा. पोटापुरते मिळते इतकेच काय ते. सरबत घ्यायची आपली इच्छा नसते, मग थोड थांबून पाठीवरच्या पिशवीतून गुळाच्या पोळ्यांचे एक पाकीट काढून मी त्या चिमुरडीच्या हातात ठेवतो. ती ते घेते आणि हातातल्या सरबताच्या ग्लासचे आता काय करायचे म्हणून सूचने साठी आजीकडे पाहते. जगण्यासाठी खाणे आवश्यक आहेच पण व्यवहारात पैसा लागतोच, त्यामुळे काही तरी विकले पाहिजे आणि पैसे आले पाहिजेत हे त्या आजीला अनुभवाने माहित असते त्यामुळे ती सरबत विकत घ्याच असा आग्रह करतेच. तो टाळून पुढे निघतो.

उशिरापर्यंत पडत राहिलेल्या पावसाने या वर्षी जमिनीत ओल धरून ठेवलेली दिसते. दोन्ही बाजूंनी वाढलेल्या कारवीच्या जंगलातून चालताना दोन्ही खांद्यांना झुडूपं घासत जातात. हातातल्या काठीचा फटका दिला तरी हि झुडूप आडवी होत नाहीत इतकी ओल या लांबलेल्या पावसानं त्यांच्यात टिकवून ठेवलेली आहे.  फुललेल्या रानफुलांच्या झुपक्यातून शांतपणे मध गोळा करणाऱ्या मधमाश्या आपल्या हालचालीमुळे त्रासून उडतात आणि कानाजवळून गुंजारव करत दूर पळतात. या जंगलात एखादा वन्यप्राणी आपल्याकडे रोखून बघतो आहे, शांत, निश्चल, स्तब्ध असा भास होतो, नव्हे ते वास्तवही असू शकते. पायाखाली एखादे सरपटणारे जनावर येत नाही हे पाहत पावल पडत राहतात.

भुतोंडे गावाचा रस्ता यायच्या आधी धनगराचे एक घरटे लागते. चौकोनी जोते, त्यावर चार-पाच फूट उंचीच्या चुना दगडात बांधलेल्या भिंती, बरोबर मधून उंच वर गेलेला खांब आणि त्यावरून भिंतींच्या कोपर्‍याकडे आलेल्या तूळया. त्याला बांधलेले वासे आणि वर घातलेले पत्रे. बरेच जुने झालेले पत्रे गंजून चंद्रमौळी झालेले. अर्ध्या भागातले तर उडूनच गेलेले. या मार्गाने आधी दोनदा गेलो तेव्हा इथे वस्ती दिसली नाही. आजही नव्हती. भिंतींचा काही भाग ढासळलेला दिसला. समोरच्या दाराच्या जीर्ण चौकटीतून आत डोकावलो तर एक चूल आणि त्यात एका ओंडक्याची झालेली राख दिसली, घराचे जोतेही झडलेले दिसले, म्हणजे वावर आहे पण वस्ती नाही. या वस्तूला घर म्हणावे का घरटे? पक्षी घरटे बांधतात, तात्पुरते.... माणसाला त्याच्या आयुष्यात आधीच असलेल्या आणि नंतर त्याने बनवलेल्या स्थावर वस्तूंना काळ जोडता येतो तसा त्यांना जोडता येत नाही. भूत काळात किंवा भविष्यकाळात जाण्याचे टाईम मशीन अस्तित्वात नाही हे खोटे आहे, माणसाचे मन हेच असे टाईम मशीन आहे, त्यामुळेच त्यान बांधलेल्या घरट्याला तो पक्के आणि कायमचे ‘घर’ म्हणतो बहुतेक.

पुढे भुतोंडे खिंड आणि मग एक टेकडी ओलांडून येणारा तीव्र घसार्याचा चढ चढून संजीवनी माचीवर प्रवेश होतो. साडेतीनशे वर्षांपूर्वीचे हे बांधकाम. इथला चिरा अन चिरा त्या काळातल्या वैभवाचा  साक्षीदार आहे. इथल्या जोत्या जोत्यावर त्या वर्तमानात पराक्रम गाजवलेल्या लोकांची पावले पडलेली आहेत. पद्मावती माचीवर प्रवेशताना समोर सदर आणि वाड्याचे अवशेष दिसतात. शिवराय आणि जिजाऊ यांच्या वास्तव्यानं पुनीत झालेली हि जागा पाहताना अंगावर रोमांच उभे राहते. शिवरायांची त्यावेळी राहण्याची नेमकी जागा, अर्थात, त्यांचे ‘ घर कुठे होते, कसे होते हे आज कोणालाच माहित नाही. काळाच्या विस्तीर्ण पट्ट्यावर घर का घरटे हा विचार मनात पुन्हा डोकावतो. पद्मावरतीच्या मावळतीच्या अंगाला चुन्याचा डोंगर दिसतो, आणि डीझेल इंजिनवर चालणाऱ्या लिफ्टने बांधकाम साहित्य वर आलेले आणि दुर्ग संवर्धनाचे काम सुरु असलेले दिसते. नवीन बांधलेल्या पायऱ्यांच्या वाटेवर एक ग्रुप भेटतो. त्यातली एक धीट चिमुरडी शिवरायांनि  सुरतच्या सुभेदाराच्या सुनेचा केलेल्या सन्मानाची कथा ठसक्यात म्हणून दाखवते आणि आमच्यासहित सर्व उपस्थितांच्या टाळ्या घेते. गेल्या पंचवीस वर्षात इथे खूप बदल झालाय. पद्मावरतीच्या तळयात आता उगाच उतरायला बंदी आहे. एके काळी डबके झालेल्या या टाक्याला आता चांगल्या तलावाचे रूप त्यामुळे आलेले आहे. विकत घेतलेल्या पाण्याच्या बाटल्या रिकाम्या झाल्या कि इकडे तिकडे टाकू नका परत द्या असे इथला विक्री करणारा तरुण मुलगा सांगतो हि जाण पोचलीय. अर्थात प्लास्टिकचा हा कचरा खालपर्यंत नेण्याची, किंवा इथेच नष्ट करण्याची प्रक्रिया इथे नाही त्यामुळे तो फक्त तटावरून खाली लोटला जातोय हे दुर्दैव. पण चला एक पाउल पुढे पडलेय.  दुर्ग संवर्धन चांगल्या प्रकारे होतय. आता अनेक लोक पर्यटनासाठी येतात, इथे घडलेला इतिहास ऐकून, पाहून प्रेरणा घेतात. काही ट्रेकिंग ग्रुप तंबू टाकून राहिलेले असतात. उत्साही तरुण शिवरायांसाठी दाढी राखून, खांद्यावर भगवे झेंडे घेऊन फिरताना दिसतात.

इतिहास जसा सांगावा तसा पोचतो. राजगड उतरताना महाविद्यालयीन तरूण-तरुणींचा एक ग्रुप भेटतो. नट्टा पट्टा केलेल्या तरुणी आणि डोळ्यावर काळे गोगल घातलेले हिंदी-मराठी-इंग्लिश बोलणारा तो ग्रुप इथे कुठे आलाय असा प्रश्न पडून जातो. त्यांच्यातल्या म्होरक्या ‘ बस अब दस मिनिट असे म्हणून इतरांना रेटत असतो. ‘ तू लवकर वर पोचलास तर संभाजी ( महाराज) त्यांची तलवार देणार नाहीत तुला असे त्याचा मित्र त्याला म्हणतो त्यावरून यांच्या पर्यंत काय इतिहास पोचलाय ते कळते.  स्थानिकांना मात्र या इतिहास  पर्यटनातून रोजगार/ उत्पन्न मिळते आणि त्यांचे ‘घर चालते हा मात्र आजचा वर्तमान आहे!

सत्यजित चितळे,

तोरणा-राजगड ट्रेक १८ डिसेम्बर २०२१