3मे २०१५, रविवारची संध्याकाळ• कमला नेहरू पार्क च्या दाराशी नेहमीप्रमाणेच गर्दी होती• कोणी आपल्या पाल्याबरोबर सुट्टीची संध्याकाळ एन्जॅाय करायला, कोणी व्यायाम करायला, कोणी वयस्क व्यक्ती समवयीन स्नेहींबरोबर पाय मोकळे करायला, तर कोणी आपल्या भावी जोडीदाराबरोबर आनंदाचे क्षण गोळा करायला तिथे आले होते• सुट्टीच्या दिवशी सायंकाळी उद्यानात जाणं, हा तर वैयक्तिक विषय आहे• लहान मुलांसाठी छोटंस्स मेरी गो राऊंड, मडक्यात विस्तव ठेऊन चणे विकणारा विक्रेता बंधू, थोड्याशा साहसी कुमारांसाठि घोड्यावरुन चक्कर, जिभेचे चोचले पुरवण्यासाठी भेळ पाणीपुरी, आणि दरवाज्याच्या उएका बाजूला साबणाचे फुगे करण्याचं खेळणं विकणारी एक गरीब भगिनी, मनाची करमणूक होईल अशा अनेक गोष्टी तिथं घडत होत्या• सामान्यपणे अशा वेळेस अनेकांना नकोसं वाटणारं असा निधी संकलनाचा उपक्रम हाती घेऊन आम्ही काही स्वयंसेवक तिथं उपस्थित होतो• रा•स्व• संघ जनकल्याण समिती, नेपाळ भूकंप ग्रस्त सहायता निधी येथे स्विकारला जाईल" असा फलक लावून, हातात पत्रके आणि पावती पुस्तकं, खांद्यावर झोळी आणि एकाच्या हातात दान पात्र असा आमचा जथ्था नागरिकांना निधीसाठी आवाहन करत होता• उपक्रमाची सुरुवात करुन थोडाच वेळ झाला होता, अजून एकहि दक्षिणा पदरात पडली नव्हती, एवढ्यात एक रिक्शा समोर थांबली• रिक्शा चालक उतरला, त्यानं फलक वाचला आणि खिशातून शंभर रुपयाची नोट काढून दानपात्रात टाकली• पावती करताना समजलं कि तो विश्रांतवाडीचा राहणारा आहे, त्यानं जाताजाता फलकावरचं नाव पाहिलं आणि अत्यंत विश्वासानं देणगी दिली• आम्हाला विशेष वाटलं• उपक्रमाची सुरुवात तर चांगल्या हस्ते झाली•
तास दीड तास गेला, स्वयंसेवक नागरिकांना आवाहन करत होते, निधीचा कुंभ भरत होता• आम्ही स्वयंसेवकांनी आपापल्या परीने "शक्य" असलेलं अंशदान देऊन झालं होतं• रात्री८-८•१५ च्या सुमारास गर्दी कमी होऊ लागली, इतक्यात समोरुन साबणाचे फुगे करणारं खेळणं विकणरी ती भगिनी आली• करकर वाजणार्या पत्र्याच्या डब्यातून एक पन्नासची नोट काढून तिनं दानपात्रात टाकली• इतका वेळ हलकं वाटणारं ते दानपात्र अचानक मणामणाचं ओझं ठेवल्यासारखं जड झालं• त्या ओझ्याला दोन पदर होते• अंशदान आणि योगदान या शब्दांमधला फरक जाणवणं हा पहिला, मला तर माझ्या क्षुद्रपणाची जाणीव झाली • ज्या विश्वासानं नागरिकांनी आणि त्या भगीनीने ते दान दिलं त्याच्या जबाबदारीचा तो दुसरा पदर• दान म्हणून गोळा झालेली रक्कम सुरक्षितपणे पोचवण्याची जबाबदारी हि तर त्यातली फारंच किरकोळ बाब होती• "देणार्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी" याचा अर्थ तिथं कळला, पण त्यातील "माझी" या शब्दावर माझं मन रिंगण घेऊन अडखळलं• ज्या बॅनरखाली आम्ही उभे होतो त्याच्यावरचा तो विश्वास.........अत्यंत निस्वार्थपणे , निरलसपणे आणि त्याचबरोबर प्राधान्यक्रमाने सेवारत अशा लाखो कार्यकर्त्यांच्या योगदानातून " रा•स्व•संघ जनकल्याण समिती" या संघटनेनं हा विश्वास संपादन केलाय• आपल्या हातून एक कणभरसुद्धा अशी चूक होऊ नये कि ज्यामुळे या विश्वासाला तडा जाईल असा दृढ निश्चय मी केला• संघाची पताका खांद्यावर घेऊन हा उपक्रम करताना माझा ऊर अभिमानानं भरून आला• मी संघाचा स्वयंसेवक आहे आणि "कार्यकर्ता" म्हणून इथं उपस्थित आहे या जाणीवेनं मन भरुन आलं• संघाचं काम करणार्यांना असे अनुभव नवे नाहित• पण असा "रिचार्ज" मिळण्यासाठी भाग्य मात्र लागतंच!
No comments:
Post a Comment