ग्रीन कॉमेट आणि ठिपक्यांची रांगोळी: सत्यजित चितळे
ग्रीन कॉमेट C 2022 / E3 (ZTF) आता सूर्याची भेट संपवून परतीच्या प्रवासाला निघालाय.किती रुक्ष नाव दिलंय इतक्या सुंदर धूमकेतू ला! हिरव्या पाचू प्रमाणे चमकणाऱ्या त्याच्या संकल्प(?) चित्र आणि अंतराळ दुर्बिणीतून घेतलेल्या फोटो चे आकर्षण वाटून पुण्यातल्या आणि पुण्याजवळच्या धुरकट आणि क्षितिज उजळलेल्या आकाशात त्याला शोधायचा प्रयत्न फारसा यशस्वी ठरला नाही. पण चला आपण त्याच्या येण्याची नोंदच नव्हे तर त्याला पाहण्याची धडपड तरी केली! हा धूमकेतू कोणा कोणाच्या पत्रिकेत डोकावून गेलाय हे मात्र एक ते पंचांग कर्तेच जाणोत आणि त्यांना नाही कळले तर त्याचे उत्तर काळ देईल. महाकाय दानासुर एका धूमकेतू किंवा अश्माच्या धडकेने झालेल्या उत्पातात नष्ट झाले इथपासून ते धूमकेतू ने मागे सोडलेल्या पदार्थातून एखाद्या विषाणू ने पृथ्वीवर रोगराई पसरवली असे विज्ञानाधारित तर्क पत्रिकेत दिसतात का? हा मात्र मला पडलेला प्रश्न आहे.
मागच्या वेळेस हा हिरवा कॉमेट सूर्याशी हितगुज करून गेला तेव्हा म्हणे पृथ्वी वर मानव खडे आणि दगडे फोडत होता, अर्थात तेव्हा पाषाण युग होते. आताही त्यानं प्रगत झालेला माणूस इतरांच्या नावानी खडे फोडताना पहिलेच असेल..
या हिरव्या धूमकेतू मुळे १९८६ मधील हॅले च्या धूमकेतू च्या भेटीच्या माझ्या आठवणी जाग्या झाल्या. पेपर मध्ये आलेल्या झुपकेदार शेपूट असलेल्या धूमकेतू च्या फोटो मुळे हरखून जाऊन माझ्यातला सातवीतला विज्ञानाचा विद्यार्थी तासंतास आभाळ निरखु लागला. आजच्या तुलनेत पुण्यातून त्या वेळेस बऱ्यापैकी तारे दिसत, पण आकाशातल्या नक्षत्र पटाची ओळख तेव्हा झाली नव्हती.अर्थातच त्याविषयी कुतूहल जागृत झाले नि माझ्या आजीला त्या विषयी विचारले. वयाच्या सातव्या दशकात असलेली माझी आजी खागोलाचा नकाशा जाणण्यात तज्ञ होती. “ दाखवीन मी तुला अभाळतल्या या ठिपक्यांच्या रांगोळ्या” असे म्हणत तिने मला नक्षत्र पट शिकवायला घेतला. सुट्टीच्या दिवसात ठिपक्यांची सुरेख रांगोळी जमायला लागायचे ते माझे वय होते पण आजी या चमचमणाऱ्या ताऱ्यांचे कल्पित आकारांना ठिपक्यांची रांगोळी का म्हणत असे ते मात्र मला तो पावेतो समजले नव्हते.
पृथ्वी ची सूर्याकडे पाठ झाली की चमचमणारे असंख्य तारे, बरेचसे आपल्या आकाश गंगेतले, काही तारका गुच्छ काही पुसट आकाशगंगा आणि तेजोमेघ, मधूनच रेघोटी आखीत प्रज्वलित होत जाणाऱ्या उल्का, या सर्वांना पाठीमागे ठेवून त्यापुढून फिरणारे ग्रह आणि कला बदलणारा चंद्र, आणि या सर्वांच्या भटकण्यात दिशा राखून ठेवणारा ध्रुव………या ध्रुवाच्या कथेपासून हा रंजक अभ्यास सुरू झाला आणि तो अजून सुरूच आहे.
ध्रुवतारा शोधायचे प्रमुख नक्षत्र शर्मिष्ठा, तिच्या आयुष्यात महत्वाचे स्थान असलेला ययाती, त्याचे प्रेम जिंकलेली पुसटशी देवयानी, यायातीचे उन्मत्त वडील सम्राट नहुष, त्याचा चौखूर उधळणारा घोडा महाश्व यांची पौराणिक कथातली ओळख आणि अभाळतली ओळख आजीने शिकवलेल्या पहिल्या काही प्रकरणातली होती.ग्रीक पुराणात कल्पिलेली ही नक्षत्र जशीच्या तशीच, नावे वेगळी पण कथा साधारण तश्याच याचे मात्र कुतूहल वाटे.
आकाशातल्या या ज्योतीच्या आकृत्या जश्या पुस्तकात दिल्या तश्याच तारे शोधून शोधून जोडून पाहताना वेळ झकास जायचा. आजी जशी कल्पना करत आहे तशीच आपण करतो आहोत का ? असा बाल सुलभ प्रश्न अनेक वेळा पडायचा. कारण कोणतेही दोन बिंदू किंवा तारे तिने हाताने जोडून दाखवले तरी तिने वर्णन केलेलाच तारा आपण पाहतोय याची खातरजमा करण्यासाठी आभाळाच्या काळया फळ्यावर रेघ मारता येत नसे. परंतु उजळणी करत करत हळू हळू बराचसा नक्षत्र पट माझ्या इवल्याशा मेंदूत फिट जाऊन बसला. त्यातल्या सर्वच आकृत्या आणि त्याला जोडलेली पौराणिक कथा या टाकाऊ नाहीत. काही आकृत्यांचे बंध तर इतक्या मंद तार्यांना जोडतात की सहज आकाशाकडे पाहणारा त्यांना ओळखणे आणि त्यांना जोडून त्यातून काही आकार निर्माण करण्याचा खटाटोप करणार नाही. पण तरीही ही नक्षत्रे आजही तारका पटावर त्यांचे स्थान टिकवून आहेत याचा अर्थ असा की जेव्हा केव्हा आआभाळतली ही रांगोळी कोणी काढली असेल तेव्हा तेव्हा माणसाच्या इतिहासात घडलेल्या काही घटनांची, पात्रांची रेखाचित्रे या आकरांशी जुळत असतीलच.
ज्योतिष शास्त्र किती काल्पनिक आणि किती शास्त्रीय पाया असलेले हा वाद बाजूला ठेवला तरी खगोलाचा आणि घडणाऱ्या घटनांचा अभ्यास आणि सांगड हा त्याचा एक अविभाज्य भाग आहे आणि त्यातही आकाशातल्या या कल्पित आकृत्यांना महत्वाचे स्थान आहे. सूर्य, चंद्र आणि सूर्य मालेतले आपले सोबती ग्रह या अकृत्यांमधून प्रवास करतात तेव्हा त्यांची नोंद घेत नाहीत इतकेच काय तर त्यातून प्रवास करणाऱ्या धूमकेतू आदी गोलांची सुद्धा नोंद घेत नाहीत पण माणसे मात्र त्यांच्या या प्रवासातल्या मुक्कामाच्या ठिकाणांची नोंद ठेवून आडाखे बांधतात.
दोन व्यक्तींना रांगोळीच्या ठिपक्यांचा एकच पट काढून दिला तर दोघांनी काढलेली रांगोळी वेगळी असेल, एखाद्याची जास्त भावणारी असेल तर एखाद्याची नुसत्याच रेघोट्या. त्या त्या ठिपक्यांची नोंद ती व्यक्ती कशी घेते यावर हे सगळे अवलंबून आहे. कधी काही दूरचे बिंदू एखादी रेघ जोडून ती रांगोळी सुंदर करतात तर कधी रांगोळी एखाद्या बिंदुभोवतीच फिरते आहे असा भास होतो. कोणी ठरवून रांगोळी प्रमाणबद्ध काढतात तर कोणी सहजच बिंदू जोडत एखादे सुंदर अर्थगर्भ चित्र रेखाटतात. कधी एखाद्या बिंदूला जोडलेली रेघ त्या रांगोळीचा समतोल बिघडवून टाकते. अर्थात पट्टीचा कलाकार अधिक काही बिंदू जोडून पुन्हा समतोल साधतो…
हॅले धूमकेतू चा पुसट ठिपका माझ्यासाठी अशीच एक सुंदर रांगोळी काढण्याची संधी घेऊन आला आणि आजही तिचे रेखाटन सुरूच आहे.
आपण सर्वजण एक रांगोळी कळत नकळत रेखाटत असतो……आज कालच्या भाषेत त्याला कनेक्टिंग डॉट्स असं म्हणतात…..
सत्यजित चितळे
१६फेब्रुवारी २०२३