30 मे 2019 गुरुवार च्या पहाटे जाग आली ती शेजारच्या कॉटेज मधून ऐकू येणाऱ्या ओंकाराने. पाठोपाठ शुद्ध स्वरात म्हणले जाणारे प्रात:स्मरणाचे श्लोक ऐकू आले. 'डॉक्टर चितळे उठलेले दिसतात' असे माझ्या मनात आले. खालच्या अंगानं गुरगुरण्याचाही आवाज आल्यासारखं वाटला, पण त्याला एक लय असल्यानं नारदमुनींच्या घोरण्याचा असावा असा मी कयास बांधला!
पहाडी मैना अर्थात मलबार व्हीसीलिंग थ्रूश ने पहाटेची सुरमयी सुरुवात इतक्यातच करून दिली. रिसॉर्ट मधील कॉटेज या चौबाजूने उत्तम प्रकारे बंदिस्त असल्याने जंगलातील इतर हालचालींचा मागोवा इथे घेता येत नव्हता. त्यामुळे रातकिड्याच्या अनाहत किरकिरी मुळे जंगलातील रात्र कंटाळवाणी वाटत होती. कॉटेजच्या आतल्या उतरत्या छपरावर काल झोपताना दिसलेली काळीकुट्ट पालीची आकृती जागा बदलून वेगळ्या पोझ मध्ये थांबलेली दिसत होती. बाहेर वाळलेल्या पानांमधून बांधलेल्या जांभ्याच्या दगडातील नागमोडी पायवाटा आणि त्याच्या हबाजूने उपड्या घमेल्याखालून प्रकाश पखेरणारे पिवळे दिवे पहाटे शांत श्रमलेले वाटत होते. सह्याद्रीच्या धारेवर घाटमाथ्याच्या पश्चिमेच्या उतारावरच्या माचीवर सूर्य उगवायचा तर चांगले 9-9.30 वाजायला हवेत आणि त्यातून इथली झाडी इतकी दाट की सूर्यप्रकाश जमिनीवर पोचता पोचता त्याचा कवडसाच हाती यावा. पण ग्रीष्मातल्या सूर्याची तळपती आभा इथे दृश्य प्रकाश पसरवण्यासाठी समर्थ होती. कडक सूर्यप्रकाशाचा अभाव आणि विविध वृक्ष आणि झुडुपे असलेल्या या जागी मे महिन्याच्या अखेरीस रात्री चक्क ब्लॅंकेट घेऊन झोपावे लागले इतकी हवा थंड आणि आल्हाददायक होती. पहाटे पासूनच मैना, धनेश गरुड, तांबट व इतर पक्ष्यांनी किलबिलाट सुरू केला. कधी अगदी जवळून एखादयाने दिलेली हाळी अगदी दुरून कोणीतरी त्याचा जातभाई होकाराने भरत होता. ध्वनी प्रतिध्वनी चा खेळ वाटावा असा कार्यक्रम पहाटे तासभर चालू होता. घनदाट पानांच्या झाडातून पक्षी मात्र आमच्याशी लपंडाव खेळत होते. त्यांची चपळ हालचाल डोळ्यातही मावत नव्हती, कॅमेऱ्याची तर बातच सोडा.
कालचीच गोष्ट.....पक्षी बघायला बाहेर पडावे तर रिसॉर्ट कडे जाणाऱ्या लाल मातीच्या खडकाळ रस्त्याच्या बाजूला उंच झाडावरून शेकरूने साद दिली. तिचा फोटोसाठी केलेला पाठलाग व्यर्थच गेला, पण त्या धावपळीनंतर रस्त्यालगत एका शुष्क झुडुपाच्या दांडीवर पोपटी रंगाचा हरणटोळ लक्ष वेधून गेला. त्याचे फोटॊ मिळवण्यासाठी केलेली धावाधाव मात्र कामास आली. वर वर शांत आणि एखाद्या तपस्वी असावा इतक्या स्तब्ध असलेल्या या सर्पाचे डोळे झूम केल्यावर त्याचा विशेष स्वभाव दाखवून गेले.
मग वेळ झाली जंगल ट्रेकची. रिसॉर्ट मधली दगडी वाट सोडून जंगलातली पायवाट पकडली आणि आपण खरंच एका वेगळ्या जगात पाऊल ठेवल्याची जाणीव झाली.इथले विविध वृक्ष, झुडुपे बघताना जाणवलं की आपल्याला या जगाची काहीच म्हणजे अगदी काहीच माहिती नाहीये. सहज शिरता सुद्धा येणार नाही इतकी घनदाट झाडी, उंचच उंच वृक्ष, वाळवीची वारूळ, पाला पाचोळ्याने आच्छादलेला डोंगर उतार, वर बघून पानांतून दिसलेच तर पूर्वेकडे डोंगर आणि पश्चिमेकडे सगराकडचे क्षितिज, इतक्या घनदाट जंगलात हमखास असणाऱ्या बिबट्या, कोल्ह्याची काल्पनिक भीती असे आम्ही तासभर चालत पाण्याच्या वाटेकडे निघालो होतो. पाण्याच्या धारेजवळच जायचा उतार एकदम तीव्र आणि घसरडा , अगदी अपेक्षित असाच. सह्याद्रीच्या मुख्य कण्यावर धोधो पडणाऱ्या पावसाचं पाणी इथं भुसभुशीत असेल ते सगळंच घेऊन जातं, फक्त कठीण काळा कातळच त्याला रोखून धरतो अशा या व्हवाळाच्या वाटेवर आम्ही उतरलो. प्रवाहाच पात्र चांगलं 30-40फूट रुंद होतं. पाण्याच्या ओढीनं मोठमोठे पाषाणसुद्धा वाहून आलेले आणि जमेल तसे बस्तान बसवून पात्रात ठिय्या देऊन बसल्यासारखे दिसत होते. इथून मग प्रवाहाच्या उगमाच्या दिशेने थोडी चाल करत गेलो, वाटेत काही ठिकाणी अजूनही दगडातून पाण्याचे झरे वाहताना दिसत होते. मग परतीचे वेध लागल्यावर नामदेवाने उजव्या हाताने सरळ वर चढाई केली. दमछाक होत अंगावरची चढण ढोर वाटेनं पूर्ण करून आम्ही चांगल्या मळलेल्या वाटेला लागलो तेव्हा पुन्हा आपल्या जगात आल्यासारखं वाटलं.
जंगलातल्या दगडांवर पांढरे वेडेवाकडे रंगावल्यासारखे छप्पे दिसले तर समजावे की इथली हवा 100% टक्के स्वच्छ आहे असे नामदेवाने सांगितले. जंगलात वाढणारी एक प्रकारची बुरशी असे छप्पे तयार करते आणि ती बुरशी फक्त शुद्ध हवेतच वाढते असे त्याने सांगितल्यामुळे आमच्या फुफुसातून एक स्वच्छ उच्छवास बाहेर पडला!. नामदेव आमचा जंगल भ्रमंतीतला वाटाड्या. गोवा-महाराष्ट्र हद्दीवरच्या "सुरल" गावाचा तरुण रहिवासी.त्याचं बालपण इथल्या मातीत गेलेलं त्यामुळे या जंगलाची त्याची चांगली ओळख आहे. माकड लिंबाचं झाड, फात्र्याबोंडाची काळी फळे अश्या वृक्षजीवनाबरोबरच अस्वलाने उकरलेले वाळवीचे वारूळ, उदमांजराची विष्ठा आणि विजेच्या चपळाईने झुडुपात गायब झालेल्या माउस डियर ची त्याला उत्तम माहिती होती. रिसॉर्ट मध्ये येणाऱ्या पाहुण्यांना जंगल ट्रेक घडवणे या बरोबरच तिथल्या हर कामात त्याची मदत होताना दिसली. त्याच्या गावच्या कोण्या केळकर नावाच्या भल्या व्यक्तीची ओळख अजिंक्य ने त्याला सांगितल्याने त्याची आमच्याशी जवळीक वाढली.मधाच्या पोळ्यांचे दर्शन जंगलात न झाल्यामुळे चंदना ने त्याला विचारले त्याचा आधार घेऊन त्याने परतल्यावर मधाच्या दोन बाटल्या आम्हाला दिल्या, आमच्या खिशात हात घालून आणि आपुलकीचे मधाचे बोट लावून सुद्धा!
या नामदेवाला भेटल्यावर मला 11 वर्षपूर्वी पावनखिंड रिसॉर्ट मध्ये भेटलेल्या शिरगावकरांच्या पदरच्या नामदेवाची आठवण झाली. पर्यटकांची सेवा करणाऱ्या आणि जंगलात रममाण झालेल्या त्या नामदेवाच्या वागण्यात मात्र कमालीचा साधेपणा होता. तोही अगदी असाच, गावाकडचा रहिवासी, पर्यटकांना सेवा पुरविण्याची हौस आणि जंगलात फिरण्याची सवय या गुणांवर उदरनिर्वाहाचं साधन मिळवलेला!
नेहमीचं जंगलातून ट्रेक करताना, निसर्गाच्या जवळ जाताना आपण तिथे काही ढवळा ढवळ तर करत नाही ना या शंकेने माझं मन खातं. भर जंगलात, अगदी समुद्राला लागून बीचवर, बर्फावरच्या सुंदर डोंगर उतारांवर पर्यटनाला मर्यादा असावी असं मला नेहमीच वाटतं. खासकरून निसर्गाशी काही देणं घेणं नसल्यासारखे वागणारे लोक भेटले की हे प्रकर्षानं जाणवतं. खरोखर कायद्यानं अशी मर्यादा घालावी तर मग नामदेवा सारख्या अनेकांचं काय?
सत्यजित चितळे
जून 2019