Sunday, May 1, 2016

याचक

याचक:
गुरुवार दत्ताचा, शनिवार मारुतीचा, रविवार........राहिलेली झोप पूर्ण करण्याचा. अशी वारांची विभागणी. सामाजिक काम करताना नक्कीच ध्यानात ठेवावी अशी. सध्या अवघा महाराष्ट्र दुष्काळाच्या झळांनी होरपळतोय, अगदी पुण्यात सुद्धा पाण्याचे रेशनिंग सुरु झालंय. दुष्काळ कां पडतोय, उपाय काय, आत्तापर्यंत झालेले सफल, असफल उपाय यांवर वर्तमानपत्रातील पाने खर्च होताहेत. अनेक संस्था, संघटना, दुष्काळावर कायमस्वरूपी मात करता यावी म्हणून कार्यरत झाल्यात. सध्या दुष्काळामुळे निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी रा. स्व. संघ जनकल्याण समिती सारख्या संघटना चारा छावण्या चालवणे , पाणी साठवण करण्यासाठी टाक्या पुरवणे यासारख्या उपाय योजना करत आहेत. अर्थातच अशा कामांसाठी आर्थिक मदत हि लागतेच. मग अभियान करावं लागतं, जनता जनार्दनाला साकडं घालाव लागतं. अश्या एका अभियाना अंतर्गत आम्ही काही तरुण आणि प्रौढ स्वयंसेवक कमला नेहरू उद्यान जवळील दत्त मंदिराच्या दारात गुरुवारी जमलो. जनकल्याण समिती चा बॅनर लावला आणि टेबल टाकून बसलो. येणाऱ्या भाविकांना पत्रक देऊन निधीसाठी आवाहन करीत होतो.
याचक म्हणून उभे राहिल्यावर फार मजा येते. जो संभाव्य दाता आहे, त्याला मागणाऱ्याचा पूर्वेतिहास माहित नसतो, त्यातून प्रथम येते ती अविश्वासाची भावना.”सगळं आभाळच फाटलंय, मी कुठे कुठे ठिगळ लावणार?” असा आव काही जण आणतात. तर काही जणांची  ‘अशी आपत्ती येते ती मानव निर्मितच आहे, आणि जे लोक जबाबदार आहेत त्यांना विचारा’  अशी भावना असते. आम्ही आधीच मदत दिलीय असे काही लोक स्पष्टपणे सांगतात, तिथे त्यांच्याशी तपशिलाची चर्चा करणे श्रेयस्कर नसते. बोलून दाखवले नाही तरी चेहऱ्यावरून या भावना स्पष्ट दिसतात, अगदी सहज वाचता येतात. लोकांचे असे चेहरे वाचताना एक वेगळीच मजा येते. काही लोक आस्थेने विचारपूस करतात, माहिती घेतात आणि मदत करतात तेंव्हा आनंद होतो. सूचना देणारे पण कोणताही सहभाग न घेणारे काही महाभाग असतात. त्याच्या कडे दुर्लक्ष करावे, त्यासाठी काही वेळेस कमालीचा संयम असावा लागतो तोही अशा उपक्रमातून अंगी येतो.
असाच वेळ पुढे सरकत होता. कणा कणानी निधीचा आकडा वाढत होता. साधारण एक तास झाला असेल, मंदिरात आरती संपली होती. उद्यानाच्या दिशेने एक वारकरी चालत मंदिराच्या  दिशेनं आला. गुडघ्याच्या खालपर्यंत आलेलं जाडंभरडं मळकं धोतर. भगव्या रंगाचा अर्ध्या बाह्यांचा सदरा. खांद्यावर अडकवलेली दोन तीन गाठोडी. पायात जाड वहाणा, डोक्यावर गुलाबी लाल रंगाचं मुंडासं आणि खांद्या वर भागवत धर्माची पताका. मंदिराच्या दारात तो थांबला. देवाच्या दिशेनं तोंड करून त्याने वाकून नमस्कार केला. काही भाविक हातात पत्रावळीतून प्रसाद घेऊन बाहेर पडत होते त्याकडे त्याच लक्ष गेलं. कोरड्या पडलेल्या ओठांवरून त्यान एक वार जीभ फिरवली. मंदिरात जाऊन प्रसाद घ्यावा का न घ्यावा असा भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटला. हा परिसर तसा उच्चभ्रू, चांगल्या वस्तीचा. तिथे हा मळकट कपड्यातला माणूस वेगळा दिसत होता. वास्तविक त्याला कोणी अडवलं नसतं, पण त्याने एक वार मंदिरात जाणार्या लोकांकडे पाहिलं. स्वातंत्र्य, समता अश्या आपल्या हक्कांची त्याला माहिती असावी पण लोक व्यवहारांच भान आणि आत्मसन्मानाची जाणीव त्याहून प्रबळ असावी त्यामुळे त्याने पुढे पाय टाकला नाही. हातात पत्रके घेऊन मी त्याला आपादमस्तक न्याहाळत होतो. तो साक्षर असणार नकीच कारण मंदिरात न जाण्याचा विचार पक्का झाल्यावर त्याने वाट धरण्याआधी एकदा सगळीकडे बघितलं आणि आम्ही लावलेल्या बॅनर कडे त्याचं लक्ष गेलं. त्याने ते पूर्णपणे वाचलं. आम्ही मदत मागतोय हे त्याच्या लक्षात आलं असाव, पण खात्री करून घेण्यासाठी आणि कदाचित आपल्याला काही मिळू शकेल काय या उद्देशाने तो टेबल जवळ आला. त्याच्याशी झालेल्या संभाषणातून समजले कि तो एक शेतकरी होता. इंदापूर परिसरात  ६ एकर कोरडवाहू शेती असलेला. दोन वर्षापूर्वी कमी पावसामुळे पेरलेले पीक हातातून गेलं आणि गेल्या वर्षी पेरणीच होऊ शकली नाही अशी स्थिती प्रत्यक्ष अनुभवलेला. त्याच्या खुरटलेल्या दाढी तील पांढरे झालेले केस आणि रापलेला चेहरा त्याचे वय नव्हे तर त्याने “न” पाहिलेले पावसाळे स्पष्ट दाखवत होते. संभाषणाचा विषय  अर्थातच दुष्काळासंबंधी होता. “हा दुष्काळ संपणार नाही, वाढतच जाणार आहे.” पिवळ्या लाल कडा झालेले त्याचे डोळे रोखत त्याने उद्गार काढले. त्याचे ते शब्द काळीज चिरत गेले. गेल्या आठवड्यात वर्तमान पत्रात जेव्हा  “ पुण्याच्या पाण्याचा एक थेंबही दौंड इंदापूरला देणार नाही “ - अशी लोकप्रतिनिधींची आरोळी वाचली तेंव्हा जशी हृदयाला घरं पडली तसंच वाटलं.
अवर्षण आणि दुष्काळ यांचा संबंध आहे, पण अवर्षण म्हणजे दुष्काळ नव्हे. ओलावा धरून ठेवण्याची जमिनीचे क्षमता असते. पावसाचे पडलेले आणि झिरपलेले पाणी भूगर्भात साठवून ठेवण्याची क्षमता असते. पाण्याचा उपसा आणि सततचे अवर्षण यामुळे जमिनीतील ओलावा कमी होतो आणि मग येतो दुष्काळ.
अर्थात “ हा दुष्काळ संपणार नाही, वाढतच जाणार आहे” हे त्याचे विधान या भौतिक दुष्काळाबद्दल नव्हतं असा मला वाटलं. पाण्याची मालकी सर्वांची, ते पुण्याचं, इंदापूरचं, बारामतीचं असं असू शकत नाही. पंच-महाभूतांची अशी क्षुल्लक वाटणी होऊ शकत नाही. किमान त्या विषयी तरी आपण एक कुटुंब आहोत असा समजलच पाहिजे.
माणसाच्या मनाची आणि मातीची तुलना नेहमीच साहित्यात केली जाते. समृद्धिचे मळे फुलवण्याची क्षमता मातीत असते तसेच सृजनाचे मळे फुलवण्याची क्षमता माणसाच्या मनात. मनात अपुलकीचा ओलावा धरून ठेवण्याची क्षमता असते. त्यातूनच बंधुभाव निर्माण होतो आणि समतेचे तत्व प्रत्यक्ष व्यवहारात येते. माणसांच्या मनातला आपुलकीचा ओलावा आटला कि मग पाण्याचीही वाटणी करायला आणि त्यावरून रणकंदन करायला तो मागे पुढे पाहणार नाही. आम्हाला भेटलेला तो याचक याच आटलेल्या माणुसकीच्या झर्याविषयी बोलला असावा असे मला वाटले.
भगवंताच्या दारात झालेला दोन याचकामधला हा संवाद. दोघेही भिन्न परिस्थितीतले, आमच स्वत: च पोट भरलेलं होत आणि पाण्याची तहानही भागलेली होती. तो वर्षांपासून उपाशी आणि तहानलेला. आम्ही दोघेही भगवंताकडे काही मागायला आलो नव्हतो. दान मागत होतो त्याच्या भक्तांकडे. आणि त्यात आम्ही ज्याच्या साठी दान मागत होतो तो भगवंत प्रतिनिधी स्वरूपात आमच्यासमोरच उभा होता. भौतिक गरजेच्या पुढे मांडून ठेवलेली अवघड समस्या आमच्यासमोर उलगडून दाखवत. ‘माणसाच्या मनातील ओलावा कसा परत आणाल?’ हा यक्ष प्रश्न समोर ठेवत त्याने आमच्या भिक्षापात्रात त्याच्या जवळचे ५ रुपये टाकले आणि हरिनामाचा घोष करत आमचा निरोप घेतला. त्याच्या पाठमोर्या आकृतीकडे मी बर्याच वेळ बघत राहिलो.

 सत्यजित चितळे