Friday, February 19, 2016

स्मशानयोगी!

स्मशानयोगी!
बर्याच दिवसांनी भेटलेल्या परिचिताशी संभाषण करताना ‘काय कसं काय बरंय ना?’ हा किंवा ‘काय म्हणता? हा प्रश्न नेहमीच सुरुवात म्हणून वापरला जातो. सामान्यपणे याचे अपेक्षित उत्तर हे ‘मजेत आहे’ किंवा ‘ चांगल चाललंय’ , समोरचा अगदी दुखाःत असेल तरी ‘ चाललय बघा’ इतकंच गुळमुळीत असतं. किंबहुना लोक-रीत म्हणून आपण तस शिकलोय. या प्रश्नाला कोणी नाही, फार वाईट चाललय असा उत्तर दिल्याचं माझ्या ऐकिवात नाही. उगाच आपल्या व्यथेची वाच्यता नको असा विचार या मागे असावा बहुतेक. काही जण खडूसपणे समोरच्याची बोळवण करण्यासाठीही हा प्रश्न सर्रास वापरतात असाही अनुभव येतो. एरवी ठीक आहे, पण हा प्रश्न जेंव्हा वैकुंठ स्मशान भूमीत मला ऐकू आला आणि त्याचे आनंदात आहे हे उत्तर जेंव्हा ऐकले तेंव्हा मात्र कान टवकारले गेले. जिथे कायम दुखाची छाया असते असा आपला समज असतो तिथे आनंदात असणारा हा माणूस कोण आहे हे कुतूहल त्यामागे होत.
एका परिचितांच्या अंत्यविधीसाठी तिथे गेलो होतो. वेळ होता म्हणून पारावर बसलो होतो. सकाळची प्रसन्न वेळ खरी पण तिथलं वातावरण उदास होत. अश्रू ढाळत येणारे मृतांचे नातेवाईक, त्यांच्याबरोबर येणारे चेहेरे पडलेले आप्त, मधूनच अॅम्ब्युलन्सची वर्दळ आणि त्याबरोबरच आपला हविर्भाग मिळण्यासाठी आतुर असलेले काव काव ओरडणारे असंख्य कावळे. मधूनच दुरून ची ची आवाज करत उडणार्या घरी. असा एकंदरीत उदास वातावरण. समोर दिसणाऱ्या अशोकाच्या झाडावरून उड्या मारणारी भारद्वाज पक्ष्याची जोडी तेवढी मनाला सुखावून गेली, शुभशकून समजतात ना त्याचे दर्शन, त्यामुळे. स्मशानभूमी मधील कर्मचारी त्यांच्या कामात व्यग्र होते. इतक्यात आमच्या एका सहकार्याला तो भेटला, त्याचा बालपणीचा सवंगडी, मार्शल सध्या स्मशानभूमीत कर्मचारी म्हणून काम करणारा. दोघांची अनेक वर्षानी भेट झाली, आणि काय कसं काय? हा प्रश्न ऐकायला मिळाला. ते दोघे गप्पा मारू लागले आणि मी त्यांच्या जवळच पारावर बसून ऐकत होतो. त्यांच्या सामायिक ओळखीच्या मित्रांबद्दल चौकशी, वैयक्तिक संसाराविशायीची माहिती अश्या त्यांच्या गप्पा रंगात आल्या होत्या. मार्शल गेली १९ वर्षे इथे काम करतोय असे त्यांच्या बोलण्यातून समजले. अर्थातच त्याने आपल्यापेक्षा जास्त पाहिलंय, माझ्या मनात आलं. भूत बघितलत का हो कधी? मी लहान मुलासारखा प्रश्न मध्येच विचारला. मार्शल हसला. हो, बघितलय की, एक नाही चिक्कार बघितलीत. आता काहितरी सुरस व चमत्कारीक  कथा ऐकायला मिळणार म्हणून मी सावरून बसलो.
इथे येतात भुतं, मार्शल सांगू लागला. पण ती सुलट्या पावलाची आणि उलट्या काळजाची असतात. आपण सगळेच इथूनंच जाणार हे माहित असतं इथे येणार्यांना, पण आयुष्याभर ‘मी आणि माझंच’ असं काल्पनिक कुंपण स्वतःभोवती मांडून बसतात. त्यापलीकडे जगंच नसतं साहेब. मग एखादा पुण्यात्मा निजधामास जातो त्याच्या शरीराबरोबर अशी भूतं येतात, चेहरे पाडून वर वर ती दुखी असल्याच नाटक करत असतात पण आतून उलट स्थिती असते. तिसर्या माणसाला त्यांच्या देहबोलीतून हे समजतच साहेब. माणूस जितका कर्तुत्ववान तितका त्याचा लोक संग्रह मोठा. दोन्ही प्रकारचे लोक येतात, चांगले आणि वाईट. मग काय, अशी भुतं असतातच सगळ्यांच्याच नशिबात. पण साहेब त्याची काय फिकीर करायची. असतील शितं तर जमतील भूतं अशी म्हणच आहे ना! मार्शल च्या निरिक्षणानं मलाच नव्हे तर तिथे उपस्थित सर्वांनाच चकित केलं.
अहो इथे चालणारे सगळे मंत्रोच्चार, आणि कर्मकांड ही गेलेल्यासाठी नसतातच, त्याच्या भोवती हि जी भूतं नाचत असतात ना त्यांच्या साठी असतात. आता हट्ट सोडाअसा त्याचा खरा अर्थ आहे. मरण कुणाला चुकलय साहेब, आपण कसे जगतो याला महत्व आहे. चला मी जातो, काम पडलय, अस म्हणून मार्शल उठला. ‘भेटू परत’ असे म्हणून गेला सुद्धा. त्याच्या आनंदात असण्याच रहस्य मला कळल.

स्मशानात राहणाऱ्या आणि त्या व्यवस्थेवर उदरनिर्वाह असणार्यांना मसणजोगी म्हणतात अस मी मागे कुठे तरी वाचल होत. मार्शल ला भेटल्यावार स्मशानयोगी या शब्दाचा हा अपभ्रंश असावा अस मला वाटून गेल.