गिर्यारोहण म्हणजे शारीरिक कष्ट हे आलंच ओघानं. हाडं गोठवणार्या थंडीत समतल नसलेल्या आणि खडकाळ जमिनीवर झोपल्यानंतर रोज मिळणारी कापसाची मऊसूत गादी हे केव्हढ मोठ्ठ सुख आहे याची जाणीव होते. तहानलेला जीव शांत करायला जेव्हा पायपीट करूनही गढूळ आणि मचूळ पाणी मिळतं तेव्हा 'नळ उघडला कि स्वच्छ पाणी' हि किती मोठी चैन आहे याची खात्री पटते. थंडीत गोठून जाणं, उन्हात अंग भाजून निघणं, घोंघावणार्या वार्यानं त्वचा कोरडी पडणं, पावसात भिजल्यामुळं पडसं होणं, लांबच लांब अंतरची पायपीट केल्यामुळं तळवे सोलवटणं , वजनदार सॅक वाहून नेल्यामुळे खांदे दुखणं आणि त्या दुखण्यामुळं रात्रभर झोप न लागणं या घटना क्लेशदायक खर्या पण त्याचीहि एक नशा असते. सृष्टीची नाना रूपं जवळून पाहण्यासाठीची हि उठाठेव कधी व्यर्थ जात नाहि, आपली दृष्टी शोधकाची असली आणि दृष्टिकोण किरकिर करण्याचा नसला तर निसर्ग आपल्याला भरभरून देतो.
हिमालयाचं वर्णन भव्य किंवा अतिभव्य या विशेषणांवाचून पूर्ण होऊच शकत नाही. मला आठवतेय ती सकाळ जेव्हा मी हिमालयाची भव्यता पहिल्यांदा पाहिली. दिल्लीहून मनालीला बसने जाताना पहाटे मी बसमध्ये शांत झोपलो होतो.बियास नदीवरच्या पन्डोह धरणापाशी जेव्हा बस पोचली तेव्हा नुकतंच उजाडलं होतं. एका बाजूस नदीचा फुगवटा आणि नजरेच्या टप्प्यात न सामावणारे अतिउंच डोंगरकाठ तर दुसर्या बाजूला धरणाच्या भिंतीचा खोलवर दिसणारा पाया आणि विक्राळ दरी , अनिमिष नेत्रांनी मी ते दृश्य बघत राहि लो. आजहि ते दृश्य जसंच्या तसं माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं.
सह्याद्रिच्या कुशीत वाढलेल्या कोणालाहि अक्राळविक्राळ दर्या आआणि आकाशात घुसलेली गिरिशिखरे यांच दर्शन नवं नाही• परंतु हिमालयातील डोंगरांची उंची आणि भव्यता ही निराळीच• या परिसरात भटकताना आपल्या बिंदुवत अस्तित्वाचि जाणीव होत राहते• तसं पाहता, सृष्टीच्या भव्यतेची जाणीव फक्त अशी हिमालयाच्या विशाल गिरिकंदरात किंवा सागराच्या अतल जलाशयायाच्या दर्शनानंच का यावी? निसर्ग हेच देवाचं दृश्य रूप आणि त्याची भव्यता सगळीकडे सारखीच, रोजच्या धकाधकीत त्याची जाणीव किंबहुना आठवण होत नाही इतकंच! कधी जरा आकाशाकडे नजर टाकावी, त्याचा खोल निळा रंग पहावा, पावसाळ्यात क्षितिजापर्यंत दिसणारं ढगांनी गच्च भरलेलं आभाळ कवेत घेण्याचा यत्न करावा, शिशिरात पहाटेच्या मंद शितल वार्यामुळे अंगावर आलेला काटा अनुभवावा, वसंतात फुलांनी बहरलेले वृक्ष डोळाभरून पहावे, सगळी रूपं सारखीच, मानवी शक्तीच्या पलिकडली!
या विश्वातल्या सर्व घटना या स्पंदनात्मक आहेत• त्यांचा आस्वाद घेण्यासाठी आपल्या इंद्रियांचं स्पंदन त्यापाशी एकरुप व्हावं लागतं• एखाद्या सुमधुर संगीतात रमण्यासाठि कानांचं ट्यून होणं जसं महत्वाचं तसंच एखाद्या सुंदर चित्राचा आनंद घेण्यासाठि डोळ्यांचं ट्यूनिंग महत्वाचं! पण मनाचं स्पंदन अशा वैश्विक घटनांशी जेव्हा एकरुप होतं तेव्हा मिळणारा अवर्णनीय आनंद हा केवळ आस्वाद घेण्यापलिकडे जातो• जेव्हा असा आनंदमय अनुभव येतो थेव्हा याचीप्रचीती येते कि निसर्गाची विविध रुपं हि वर्णन करुन सांगण्याच्या गोष्टी नाहीत थर प्रत्यक्ष अनुभवण्याचे विषय आहेत•
गंगोत्रीमधे भागीरथी गंगेच्या मंदिरासमोर बसलो होतो• ६•30~ ६•४५ चा सुमार असेल• अरुंद अशा त्या दरीत अंधार पसरु लागला होता• गंगोत्रीमधे सायं ७ ते ९ एव्हढाच वेळ वीज असते, तीसुद्धा जनरेटरवर• मंदिरात आरती सुरु झाली होती• झांजा आणि घंटानाद दरीत भरून गेला होता• त्या तालबद्ध आवाजात शेजारून वाहणार्या भागीरथीचा खळखळणारा नैसर्गिक चैतन्यमय ध्वनी विरून गेला होता• गंगोत्रीतच एक सुंदर प्रपात आहे• भागीरथीचं पाणी या डोहात उडी घेऊन अरुंद दरीतून पुढे वाहत जाते• या कुंडाला गौरीकुंड म्हणतात• केदारतालहून उगमपावणारी केदारगंगा इथं भागीरथीत विलीन होते• या घुमटाकार कुंडातून कोसणार्या पाण्याचा धीरगंभीर नाद येत राहतो• मंदिरातील घंटानादात हा ध्वनीहि विरुन गेला होता• मंदिरासमोर यात्रेकरूंची गर्दी झाली होती• आम्ही गर्भगृहासमोरच आवारातील पायरीवर बसलो होतो• आरतीच्या शेवटच्या चरणात प्रमुख पुजारी पंचारती घेऊन बाहेर आले• भागीरथीच्या पात्राकडे वळून त्यांनी पंचारती ओवाळल्या• गंमत म्हणजे आरतीचं पठण कोणीच करत नव्हतं, सगळे गप्प गप्प!
आरती संपली आणि यात्रेकरूंनी गर्भगृहाच्या दाराजवळ एकच गर्दी केली• प्रमुख पुरोहित काहि मंत्र पुटपुटत बाहेर आले आणि त्यांनी हातातील कमंडलूतील तीर्थ सर्वांवर शिंपडलं• त्यातील जलबिंदु ज्यांच्या अंगावर पडले ते धन्य झाले, ज्यांना त्याचा लाभ झाला नाही त्यातले काही अक्षरश: धाय मोकलून रडू लागले• यात्रा पूर्ण करुन पुण्य पदरी पाडण्याची त्यांची संधी गेली! मला त्यांची कीव करावीशी वाटली• ज्याची पूजा बांधायची तो प्रत्यक्ष परमेश्वर निसर्गाच्या रूपात समोर असताना रूढींमधे गुंतलेले ते भाविक पूजाविधींच्या उपचारासाठी धडपड करत होते•
सृष्टिच्या अनेक निर्मितींपैकी सर्वश्रेष्ठ निर्मिती म्हणजे मानवी देह, कारण तो सृष्टीच्या इतर रूपांचा डोळस विचार करे शकतेा• स्वाभाविकच मानवाला त्याच्या देहाचा अहंकार निर्माण होतो• इतर सर्व प्राणीमात्रांमधे मीच श्रेष्ठ असं त्याला वाटतं•निराकार परमेश्वराची मानवी देहस्वरूपात मूर्ती साकारणं हे त्याच अहंकाराच रूप नाही ना?
निसर्गाच्या रूपांतून परमेश्वराचं दर्शन होणं फार अवघड, कदाचित सामान्य बुद्धिच्या पलिकडलं असं काहिसं आहे• म्हणून मग परमेश्वरालाच मूर्ती स्वरूपात समोर ठेवणं आणि त्याची रूपं समजावून घेणं सोप आहे, अस असाव कदाचित• पण उपासना पद्धतीचा बाजार होतो हे मात्र बरोबर नाही•
निर्गुण निराकार परमेश्वराची भक्ती आणि अनुभूती अतिशय अवघड आहे• त्या मार्गातील मुख्य टप्पा हा निर्गुण पण साकार मूर्तीपूजेचा त्यापुढचा टप्पा सगुण पण निराकार निसर्गपूजेचा असणार असं तिथं वाटून गेलं•
आदल्या दिवशी आम्हि आॅडेन्स कोल सर करण्याचा प्रयत्न केला• पुरेशा साधनांअभावी तो फसला• कॅम्पवर परत यायला दुपार झाली• हा बेस कॅम्प आवरून एक पायरी खाली जाण्याचा मूळ बेत होता• पण आधीच्या कॅम्पवर पाण्यावाचून हाल झालेले होते आणि फक्त २-३ तासात दोन कॅम्प एव्हढं अंतर कापणं अवघड होतं• त्यातच हवामान खराब होऊ लागलं, गार वारं सुटुन ढग जमा होऊ लागले• त्यामुळे गंगोत्री ३ च्या पायथ्याचा तो आॅडेन्स समिट कॅम्प गुंडाळण्याचा निर्णय त्या दिवसापुरता स्थगित करण्यात आला• आम्ही थंडीत कुडकुडत तंबूत विसावलो• संध्याकाळपासून बर्फवृष्टीला सुरुवात झाली• सगळी दरी ढगानं भरुन गेली• मागचं गंगोत्री३ आणि समोरचं जोगीन १ शिखर धुक्यात हरवून गेलं• अशा वेळेस कॅम्पवर फारसं काही होत नाही• उजेड असेपर्यंत थोडं वाचन/ लेखन, गप्पा यातच वेळ घालवावा लागतो• अंधार झाला, भुरु भुरि बर्फ पडतच होता• ६•30वा जेवण आणि ८ वा पावडर कालवून केलेलं गरम दूध घेतलं कि स्लिपिंग बॅगमधे शिरायचं असा तिथला कार्यक्रम.
त्या यात्री झोप चांगली लागली• वास्तविक मोहीम असफल झालेली होती तरीहि! एखादि मोहीम यशस्वी होण्यामधे गिर्यारोहकाचा वाटा १% किंवा कमीच असतो आणि परमेश्वराची इच्छा ९९% असते, पण एखादि मोहिम जेव्हा अपयशी होते तेव्हा हेच प्रमाण उलट होतं आणि ते मान्य करता आलं पाहिजे•
पहाटे ३•१५ च्या सुमारास जवळच कुठेतरी लॅंड स्लाईड झाल्याचा आवाज दरीत घुमला आणि जाग आली• जरा बाहेर पडाव असा विचार केला, धडपडत टॅार्च शोधला , डोक्यावरची टोपी सारखी करत स्लिपिंग बॅगमधून बाहेर आलो• तापमान जेव्हा शून्याखाली जातं तेव्हा उच्छ्वासाद्वारे बाहेर पडणारं बाष्प तंबूच्या आतून बर्फाची एक चादर तयार करतं• डोक्यावरची टोपी त्यावर झासली गेल्यानं त्याचे काहि फ्लेक्स अंगावर पडले• तंबूवर बर्फाचा इंच दिड इंच जाडीचा थर जमला असावा, कारण या धडपडीमुळे ते बर्फ घसरुन खाली पडलं, त्याचा खस्स् असा आवाज झाला• " किती वाजलेत रे?" बाजूला झोपलेल्या निखिलनं स्लिपिंग बॅगमधूनच प्रश्न केला• "३.१५, मी आलोच ५ मिनिटात, थंडी फारच वाजतीय" मी उत्तरलो• तंबूच्या आतल्या आवरणाची चेन उघडून मी पाय बाहेर ठकलले• अंगावरच्या कपड्यांच्या ४ जोडांसहित १६००० फुटांवर केलेली थोडिशी हालचालसुद्धा दमछाक व्हायला पुरेशी असते• थंडीनं गोठून कडक झालेले बूट पायात चढवणं हे असंच एक जिकिरिचं काम• बूट चढवून आणि बाहेरची चेन उघडून मी धापा टाकत रांगत बाहेर आलो• संपूर्ण हिमनदीवर शुभ्र भुसभुशीत बर्फाची दुलई पसरली होती• चंद्र गंगोत्री शिखरामागे गेल्यामुळे आमच्या कॅम्पवर सावली पडली होती, पण जरा पलिकडे हिमनदीवरचं बर्फ त्या दुधाळ चांदण्यात शुभ्रधवल चमकत होतं• मी हाताचा आधार घेत उभा राहिलो आणि मला दिसलं निरभ्र आकाश• समोर चमकणारं जोगीन१ आणि मागे गंगोत्री३ यामधून आकाशाचा थोडासाच पट्टा दिसत होता पण तिथंहि तारकांची भाऊगर्दी झाली होती• पुण्यातल्या चतकोर आकाशाचं निरिक्षण करणारा मी , मला त्या भाऊगर्दीत ओळखीचे तारे देखील सापडेनात•
माझ्या अगदि समोर जोगीन शिखरावरुन खाली जेप घेऊ पाहणारी हिमनदी दिसत होती आणि त्याच्यावरच्या बाजूस तेजस्वी शुक्र दिसत होता• शुक्राचं पूर्ण तेजानं चमकणारं बिंब मी या पूर्वीहि पाहिलय पण शुक्राचं खरखुरं चांदणं मी त्या दिवशी अनुभवलं• जोगीन हिमनदीवर पडलेला प्रकाश हा चंद्राचा नसून शुक्राचा आहे हे जाणवण्याइतक्या तेजानं तो चमकत होता• कडाक्यायच्या थंडीत विस्फारलेल्या डोळ्यांनी मी ते दृश्य पाहत किती वेळ उभा होतो ते मला आठवत नाही• सृष्टीच्या त्या स्पंदनांनं माझ्या मनाची तार छेड ली गेली•
स्पंदन......... वारंवारता हा स्पंदनाचा अविभाज्य गुणधर्म• वारंवारता याचाच अर्थ फिरून त्याच जागी येणं• याचा अर्थ असा कि प्रत्येक घटकाचं आणि घट नेचं चक्राकार मार्गानं त्याच जागी परत येणं• यात घटकाचं भौतिक रूप बदलणार पण त्याचा स्थायीभाव त्या चक्राचा नियम पाळत राहणार• दुसराहि एक अर्थ असा कि या जगती घडणार्या कुठल्याच घटनेला सुरूवात आणि शेवट हे संदर्भ नाहित!
मी काल होतो आज आहे, आणि उद्याहि असणार आहे या तत्व सिद्धांतामधे, काल, आज आणि उद्या हे काळाशी संबंधित आहेत• मुळात काळ हा लवचिक आहे म्हणजे या सिद्धांतामधील "मी" हा स्थिर म्हणजेच कॅान्स्टंट आहे याची पुसटशी जाणीव मला स्पर्शून गेली• या मी ची ओळख आणि दर्शन मात्र अजून झालेलं नाही• ते इतक सोपहि नाही•